आषाढी एकादशीसाठी एसटीच्या 4700 जादा गाडय़ा, परिवहनमंत्र्यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी एकादशीनिमित्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होत असते. कोरोना संकटात दोन वर्षे निर्बंधामुळे ऐतिहासिक वारीवर बंधने आली. आता कोरोनाचे संकट टळले असल्याने यंदा पुन्हा त्याच आध्यात्मिक उत्साहात वारकऱ्यांची मोठी गर्दी उसळणार असल्याने त्यांच्या दिमतीला एसटी महामंडळाने 4700 जादा गाडय़ांची व्यवस्था केली आहे.

पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळ सुमारे 4 हजार 700 विशेष गाडय़ा सोडणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी केली आहे. 6 ते 14 जुलैदरम्यान या विशेष गाडय़ा धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळय़ासाठी (8 जुलै रोजी) 200 अतिरिक्त बसेस उपलब्ध केल्या आहेत.

आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती या शहरातून गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार संभाजीनगरातून 1200, मुंबई 500, नागपूर 100, पुणे 1200, नाशिक 1000 तर अमरावती येथून 700 अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऍड. परब यांनी केले आहे.

चार तात्पुरती बस स्थानके

भाविकांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत.

बसस्थानकांचे नियोजन

स्थानकाचे नाव          सोडण्यात येणाऱ्या बसेस

चंद्रभागा बसस्थानक     मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे, पंढरपूर
भीमा यात्रा               देगाव संभाजीनगर, नागपूर व अमरावती
विठ्ठल कारखाना         नाशिक, जळगाव, धुळे, नगर
पांडुरंग बसस्थानक      सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग