
ग्राहकांनी थकीत वीज बिलाचा भरणा करावा म्हणून महावितरणकडून विविध सवलती दिल्या जात असल्या तरी त्याला ग्राहकांकडून दाद दिली जात नसल्याचे समोर आले आहे. एकट्या भांडुप परिमंडळातील ग्राहकांनी तब्बल 480 कोटी रुपयांचे वीज बिल थकवले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन महावितरणने आतापर्यंत एक लाख 16 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.
भांडुप परिमंडळात जवळपास 24 लाख वीज ग्राहक आहेत. त्यापैकी जवळपास 14 लाख वीज ग्राहक थकबाकीदार आहेत. 480 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांकडे 235 कोटी रुपये थकीत असून पथदिव्यांच्या थकबाकीचा आकडा 185 कोटी रुपये एवढा मोठा आहे, तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची थकबाकी 5 कोटी 76 लाख रुपये, इतर ग्राहकांकडे आठ कोटी 85 लाख रुपये थकीत आहेत. थकीत वीज बिलाचा भरणा करण्याबाबत वारंवार आवाहन केल्यानंतरही ग्राहक वीज बिल भरण्यास टाळत आहेत. त्यामुळे संबंधित थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिले आहेत.

























































