
ऐतिहासिक किल्ले पन्हाळ्यावर नगरपालिकेच्या दारात कित्येक वर्षे तशाच पडून राहिलेल्या पाच तोफा तोफगाडय़ांवर विराजमान होणार आहेत. शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्रच्या वतीने यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती शिवराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, रविवारी (दि. 21) ऐतिहासिक मिरजकर तिकिटी येथून युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्र गेल्या 30 वर्षांपासून पन्हाळगड-पावनखिंड मोहिमेसह दर रविवारी पन्हाळगड संवर्धनाचे कार्य करत आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळगडावर मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, अतिवृष्टीकाळात गाईड लोकांना धान्याचे वाटप यांसह अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी गडावरील पाच तोफांना तोफगाडे तयार करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
पन्हाळा नगरपालिकेच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून या तोफा ऊन- वारा-पावसाला तोंड देत आहेत. या ऐतिहासिक तोफांचे संवर्धन होणे काळाची गरज होती. त्यासाठी बाभळीच्या जुन्या लाकडामध्ये राजाराम आणि बाळकृष्ण सुतार या पिता-पुत्रांनी कलाकुसरीने हे अस्सल मराठा तोफगाडे बनवले असल्याचे प्रशांत साळुंखे यांनी सांगितले. यावेळी शीतल अडसुळे, मोहन खोत, विनायक जरांडे, निखिल मोरे, राहुल पवार आदी उपस्थित होते.