तहसीलदार घोंगडीवर बसले आणि पाणीप्रश्न सुटला; परमेश्वर कासुळे यांचा झटपट निर्णय, फुगाळे, दहिगावमध्ये बसवल्या 5 हजार लिटर क्षमतेच्या टाक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणीटंचाई ही शहापूर तालुक्याच्या जणू पाचवीलाच पुजलेली आहे. कोट्यवधींच्या योजना सरकारने आणल्या तरी येथील माता-भगिनींना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पण अधिकाऱ्यांच्या मनात आले तर पाणीप्रश्न तत्काळ सुटू असतो याचा प्रत्यय फुगाळे व दहिगाव येथील आदिवासींना आला. घोंगडी बैठकीदरम्यान तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी झटपट निर्णय घेतला आणि आदिवासी पाड्यांवरील पाणाप्रश्न लगेच सोडवला. फुगाळे व दहिगावमध्ये श्री वामन विघ्नेश्वर प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्या बसवल्या आहेत. त्यामुळे येथील आदिवासींची पाण्यासाठी होणारी वणवण अखेर थांबली असून स्थानिकांनी तहसीलदारांचेही आभार मानले आहेत.

शहापूर तालुक्यातील अनेक दुर्गम गावपाडे सध्या उन्हाचे चटके सहन करीत पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. लोकसंख्येनुसार एक किंवा दोन दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी बहुतांशी गावपाड्यांवरील आदिवासी कुटुंबांकडे हंडा कळशीव्यतिरिक्त पाणी साठवण्यासाठी पुरेशी साधने नाहीत. त्यामुळे त्यांची मोठी अडचण निर्माण होते. टँकरमधील उर्वरित पाणी विहिरीत टाकावे लागत असून गाव आणि विहीर यामध्ये अर्धा ते एक किलोमीटर अंतर असल्याने महिलांना रखरखीत उन्हात पाण्यासाठी फिरावे लागते.

समस्या जाणून घेताच कार्यवाही

घोंगडी बैठकीच्या दरम्यान तालुक्यातील फुगाळे व दहिगाव येथील दोन आदिवासी पाड्यांवर पाणी साठवणुकीची समस्या प्रकर्षाने समोर आली. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी ठाणे जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या शहापूर येथील श्री वामन विघ्नेश्वर प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्थेशी समन्वय साधण्यात आला. त्यानंतर अतिदुर्गम फुगाळे गाव तसेच दहिगाव येथील दोन आदिवासी वाड्यांमध्ये पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. फुगाळे गावचे सरपंच जिवा भला तसेच दहिगावचे उपसरपंच दीपक सापळे यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि श्री वामन विघ्नेश्वर प्रतिष्ठानचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.