
मातृत्व हे एका स्त्रीला मिळालेलं वरदान आहे. पण काही दुर्दैवी स्त्रिया मातृत्वापासून वंचित राहतात. अशा अनेक स्त्रियांना सरोगसी सारखा मार्ग वरदान ठरत आहे. याच माध्यमातून एका 51 वर्षांच्या महिलेने स्वतःच्या मुलीच्या बाळाला जन्म दिला आहे.
ही घटना अमेरिकेतील शिकागोमध्ये घडली आहे. शिकागो येथे राहणारी 29 वर्षांची ब्रिएना लॉकवुड ही गर्भधारणा करण्यास असमर्थ होती. दोन वेळा गर्भवती राहिलेल्या ब्रिएनाला गर्भपाताला सामोरं जावं लागलं. त्यानंतर तिच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे तिला गर्भधारणा करण्यास अडथळा येत होता.
या दरम्यान ब्रिएनाने आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदतही घेतली. मात्र, सर्व उपाय निष्फळ ठरले. या सर्वामुळे ब्रिएना मातृत्वाच्या विवंचनेत होती. तिची ही अडचण समजून घेतली ती तिची आई जूली हिने. तिने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्या मुलीच्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला.
51 वर्षांच्या जूलीने मोठ्या हिमतीने आपल्याच नातवंडाला जन्म दिला. या दरम्यान ब्रिएना सतत तिच्या सोबत होती. ब्रिएनाच्या मते तिची आई एक सुपरवुमन आहे. आईने तिची अडचण समजून घेऊन तिला मदत केली आणि त्यासाठी स्वतः पुढाकार घेतला, याबद्दल ती नेहमीच कृतज्ञ राहिल, असं मत तिने व्यक्त केलं आहे.
























































