
शिर्डी विमानतळावर 527 कोटी रुपये खर्च करून नवीन टर्मिनल इमारत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ट्विट करीत दिली आहे.
श्रीक्षेत्र शिर्डी येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. शिर्डीत रेल्वेबरोबरच आता विमानसेवा सुरू झालेली आहे. विमानाच्या उड्डाणांची संख्या वाढल्याने दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे.
कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावर नवीन प्रवासी टर्मिनल इमारत उभारली जाणार असून, यात तासाला सुमारे 1200 प्रवासी हाताळण्याची क्षमता असणार आहे. सुमारे 55 हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर हे काम होणार आहे. 527 कोटी रुपयांच्या या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून, दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले आहे.
सुंदर, अद्ययावत आणि भविष्यातील वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेऊन ही इमारत बांधली जाणार आहे. प्रकल्पाच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी विमानतळ प्राधिकरणाने आधीच सल्लागार नेमला आहे. या प्रकल्पाची वर्कऑर्डर एप्रिलमध्ये जारी केली जाण्याची शक्यता आहे. दुमजली नवीन टर्मिनल इमारतीची प्रस्तावित उंची सुमारे 18 मीटर असेल. ग्राऊंड लेव्हलमध्ये चेक-इन हॉल, पॅसेंजर क्रीनिंग आणि रिमोट सिक्युअर होल्ड एरिया आणि बॅगेज हाताळणी यंत्रणा असेल. नवीन टर्मिनलवर देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पृथक्करणासाठी तरतूददेखील केली जाईल. कारण भविष्यात विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणे होऊ शकतात. त्यात एअरो-ब्रिजदेखील असतील.
गेल्या महिन्यात ‘डीजीसीए’ने विमानतळाला नाइट लॅण्डिंगचा परवाना दिला होता. त्यामुळे येणाऱया काही दिवसांत विमानतळावरून संध्याकाळची उड्डाणे सुरू होतील. तसेच व्यावसायिक विमाने विमानतळावर ये-जा करू शकतील.


































































