
सामना ऑनलाईन । गिरिडीह
अन्नाविना एका महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत लाजिरवाणी आणि मनला चटका लावून जाणारी घटना समोर आली आहे. झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील डुमरी येथील हा धक्कादायक प्रकार आहे. तीन दिवस खायला काहीही न मिळाल्याने तडफडून तडफडून एका महिलेचा जीव गेला असून सावित्री देवी(५८) असं या महिलेचं नाव आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाच्या बेजबाबदारपणा आणि अनागोंदी कारभारामुळे सावित्री देवी यांना रेशन कार्ड मिळालं नव्हतं. ज्यामुळे त्यांना सरकारी रेशन दुकानातून धान्यही मिळत नव्हतं, अशी माहिती डुमरीच्या सरकारी एमओ शीतल प्रसाद यांनी दिली. तसेच दोषींवर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
सावित्री देवी यांनी रेशन कार्ड बनवण्यासाठी खूप प्रयत्न केल्याची माहिती त्यांची सून सरस्वती देवी यांनी दिली. पुढे सरस्वती देवी म्हणाल्या की, तीन दिवसांपासून सावित्री देवी उपाशी होत्या. त्यांची दोन मुले मिळेल ते काम करून पैसे कमावतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून भीक मागून पोट भरत असल्याचं सरस्वती यांनी सांगितलं.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना स्थानिक आमदार जागरनाथ महतो म्हणाले की, ‘एखाद्या व्यक्तीचा काही खायला न मिळाल्याने जीव जाते ही चिंताजनक बाब आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि बेजबाबदारपणामुळे या महिलेचा बळी गेला आहे. या घटनेबद्दल मी विधानसभेत आवाज उठवणार आहे.’



























































