
सामना ऑनलाईन, मुंबई
झोपडपट्टय़ा तसेच दुर्गम भागांत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, नागपूर, पुणे, अमरावती, संभाजीनगर, परभणी आणि नांदेड अशा 60 ठिकाणी हे दवाखाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. यासह डायलिसीस सेंटर, कर्करोग तपासणी, आरोग्यवर्धिनी केंद्र, मिशन मेळघाट या योजनांचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
आरोग्य विभागाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ वांद्रे येथील एमएसआरडीसी सभागृहात करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आरोग्य विभागात काय काय करणार याचे वचन मागील विधानसभा निवडणुकांआधीच शिवसेनेने दिले होते. दिलेली वचने पूर्ण होत आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या नावाने ‘आपला दवाखाना’ सुरू होत आहे. बाळासाहेबांकडे समस्या घेऊन जाणाऱ्याच्या प्रत्येक समस्येवर इलाज व्हायचाच. त्यानुसार या दवाखान्यातही गेलेला रुग्ण ठणठणीत बरा होऊनच बाहेर पडेल़ यावेळी मुंबई शहर पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगर पालकमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.
शिवआरोग्य सेवा कार्यान्वित व्हावी
अत्यंत दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरविणाऱ्या ‘शिवआरोग्य सेवा’ या योजनेचा संकल्प शिवसेनेने सोडला. टेलिमेडिसीनच्या माध्यमातून शहरातील डॉक्टर अगदी दुर्गम, ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार देऊ शकतात. त्यामुळे ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हायला हवी, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली.
मिशन मेळघाट अंतर्गत सप्तपदी उपक्रम
मिशन मेळघाट उपक्रमांतर्गत या भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य व अन्य विभागांच्या सहाय्याने सप्तपदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गर्भवती माता, बालरुग्ण यांची काळजी घेण्यासह आरोग्य यंत्रणेची सक्षमता वाढविण्यासह अनेक योजनांचा यामध्ये समावेश आहे.
आरोग्य सेवेचा महामार्ग -विनोद तावडे
माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तयार केलेल्या आरोग्याच्या राजमार्गाचे रूपांतर रस्तेविकासाचे खाते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी महामार्गात केले आहे. आरोग्य, शिक्षण, कुठलाही किभाग असो, राज्य शासनाने त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत सामान्यांना अधिक गतिमान सेवा दिली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामान्यांना अपेक्षित सेवा देण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचे तावडे यांनी सांगितले.
विकासाबरोबर नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी
आधुनिकीकरणाबरोबर आपण आजापणाला आमंत्रण देत आहोत. मुंबईत जिकडे-तिकडे मोठय़ा प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. धुळीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. एकीकडे झाडे तोडायची आणि दुसरीकडे एअर प्युरिफायर यंत्रे लावायची, अशा कृत्रिमपणाला आळा घालायला हवा. विकासामुळे जर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असेल तर असला विकास काय कामाचा, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
स्कयंचलित रक्तदाब तपासणी यंत्र रेल्के स्थानकांकर बसकिणार
राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाबाचे नियंत्रण करण्याकरिता स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्रे राज्यात सातारा, सिंधुदुर्ग, वर्धा आणि भंडारा या 4 जिल्हय़ांमध्ये तसेच काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांकर बसविली जाणार आहेत.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग, मौखिक कर्करोग याची तपासणी केली जाणार आहे.
राज्यात टप्प्याटप्प्याने 10 हजार 668 उपकेंद्रांचे, 1828 ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आणि 605 नागरी आरोग्य केंद्रांचे आरोग्यकर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. सध्या 343 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर करण्यात आले आहे.
डायलिसिस सेंटरची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी 31 ठिकाणी डायलिसिस केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या 31 पैकी 26 डायलिसिस सेंटरचा दर्जा सुधारण्यात आला आहे. डायलिसिस केंद्रे वाढवून डायलिसिससाठीची वेटिंग लिस्ट संपुष्टात आणली जाणार आहे.
बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार
आरोग्य क्षेत्रात काम करणारे अधिकारी, संस्था, माध्यम, आदिवासी भागात काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना या वर्षीपासून ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
राज्यात 60 ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’
‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ 10 महापालिका क्षेत्रांत 60 ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. ठाणे-10, कल्याण-डोंबिकली-10, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, नागपूर, पुणे, अमरावती, संभाजीनगर, परभणी आणि नांदेड येथे प्रत्येकी 5 क्लिनिक सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

































































