
चीनमधून पसरलेल्या कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगातील 100 देशात हा वायरस पसरला असून आतापर्यंत 4 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्येही हा वायरस पसरला असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री नदीन डॉरिस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आरोग्य मंत्री नदीन डॉरिस यांची चाचणी पॉसिटिव्ह निघाली आहे. त्यांना त्यांच्याच घरात वेगळे ठेवण्यात आले आहे. नदीन यांच्या संपर्कात पंतप्रधान बोरीस जॉनसन आणि इतर लोकही आले होते. त्यांचीही आता कोरोना टेस्ट होणार आहे.
जगाच्या 100 देशांमध्ये कोरोना विषाणू पसरला आहे. आतापर्यंत 1 लाख 10 हजार लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 4 हजार 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 373 जणांना लागण झाली आहे.
हिंदुस्थानातही कोरोना वायरस पसरला असून 59 जणांना लागण झाली आहे. पुण्यात कोरोना लागण झालेले पाच केस सापडले आहेत. सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
इराणमध्येही कोरोनाने हाहाकार उडवून दिला असताना तिथे अडकलेल्या 58 हिंदुस्थानींना अखेर हवाई दलाच्या विमानाने मायदेशी आणण्यात आले.
चीनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूने तीन हजारांहून अधिक चिनी नागरिकांचे बळी घेतले. त्यानंतर संपूर्ण जगभरात या विषाणूने हातपाय पसरले आहेत. जगभरातील बळींची संख्या 4,011 वर पोहोचली आहे, तर 1,10,000 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. हिंदुस्थानात केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बंगळुरू आणि जम्मू-कश्मीर या राज्यांना विषाणूच्या फैलावाची चिंता वाढली आहे. अवघ्या काही दिवसांत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 59 वर पोहोचली आहे.
चीनमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी एका हॉटेलमध्ये विशेष वैद्यकीय केंद्र उभारले होते. संबंधित हॉटेल कोसळून जवळपास 70 कोरोनाग्रस्त ढिगाऱयाखाली दबले. यातील काहींची सुखरूप सुटका करण्यात आली. दुर्घटनेतील बळींची संख्या 20 वर गेली असून अजून 10 रुग्ण ढिगाऱयाखाली सापडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
























































