
बेस्टने महिला प्रवाशांसाठीच्या सहा ‘तेजस्विनी’ बस सेवेत रुजू केल्या आहेत. तेजस्विनी महिला स्पेशल उपक्रमाअंतर्गत बेस्टच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने एकूण 37 बसचा समावेश होणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांची सोय होणार आहे.
सध्या तेजस्विनी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीएपर्यंतच्या विशेष 1 मार्गावर चालवली जात आहे. या बस सकाळी 8.05 ते 11.30 आणि दुपारी 4.30 ते रात्री 8.00 या वेळेत चालवण्यात येतील. पुढे टप्पाटप्प्याने तेजस्विनी बसेस जसजशा दाखल होतील तसतशा त्या इतर मार्गांवरदेखील चालवल्या जातील. त्यामुळे कार्यालयात जाणाऱया महिला प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. तेजस्विनी बस सेवेसाठी राज्य सरकारकडून 11 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या बसची किंमत सुमारे 30 लाखांपर्यंत असून ही नॉन एसी आणि मिनी बस डिझेलवर धावते.


























































