
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-भूपकरवाडी येथील गणेशकोंडच्या पाण्यात आढळलेली भलीमोठी सात फुटी मगर अखेर वन विभागाने मंगळवारी मोठय़ा शिताफीने जेरबंद केली. सोमवारी दुपारपासून सुरू असलेल्या बचाव मोहिमेला आज दुपारी 1 वाजता यश आले. संबंधित मगर कुडाळ वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. मगरीला पाहण्यासाठी बघ्यांची दोन दिवस मोठी गर्दी जमली होती.
पिंगुळी-भूपकरवाडी येथील कृष्णा चव्हाण या तरुणाला सर्वप्रथम सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गणेशकाsंडच्या पाण्यात मगर दिसून आली. मगरीच्या शोधासाठी पाणी कंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्यात अचानक पाऊस आल्याने बचाव पथकाच्या प्रयत्नांना मोठा अडथळा निर्माण झाला. सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत तपास सुरू होता.
मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले. इंजिनाच्या सहाय्याने पुन्हा गणेशकोंडमधील पाणी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या जलद बचाव पथकाने जाळीच्या मदतीने मगरीला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. एकदा मगर जाळ्यात सापडली; मात्र ती जाळ्यातून निसटण्यात यशस्वी झाली. अखेर दुपारी एकच्या सुमारास वन विभागाने मगरीला यशस्वीपणे जेरबंद केले. गणेशकाsंडमध्ये मगर पकडल्याने अखेर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.






























































