क्रूझर पलटी होऊन सात मजूर ठार, पाचजण गंभीर जखमी; गोकाक-बेळगाव मार्गावर अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेळगाव येथील सांबरा परिसरात रेल्वेच्या रुंदीकरणाच्या कामावर क्रूझरमधून निघालेल्या मजुरांवर काळाने घाला घातला. भरधाव निघालेल्या चालकाचा ताबा सुटल्याने क्रूझर नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात सात मजूर जागीच ठार झाले, तर पाचजण गंभीर जखमी झाले असून, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गोकाक-बेळगाव मार्गावर बेळगाव येथील कल्याळ ब्रिजजवळ आज सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.

अडिवेप्पा चिलभावी (वय 45), बसवराज दळवी (वय 32), बसनगौडा हन्मन्नावर (वय 48), आकाश गस्ती (वय 31), फकीरप्पा रणप्पा हरिजन (वय 55, सर्वजण रा. अक्कतंगेरहाळ, गोकाक), बसवराज मल्लप्पा सनदी (वय 48, रा. मल्लापूर, गोकाक), कृष्णा रामाप्पा खंडूर (वय 36, रा. दासनहल्ली, गोकाक) अशी अपघातात ठार झालेल्या मजुरांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ परिसरातील मजूर तीन क्रूझरने सांबरा- सुळेभावी रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या कामावर मजुरीसाठी जात आहेत. आजही सकाळी तीन क्रूझरमधून गोकाक-बेळगाव मार्गावरून निघाले होते. गाडी पुढे-मागे वेगाने पळविण्याच्या प्रयत्नात एका चालकाचे क्रूझरवरील नियंत्रण सुटून हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे. तीनवेळा क्रूझर पलटी होऊन बळळारी नाल्यात कोसळली. यामध्ये सात मजूर जागीच ठार झाले, तर पाचजण जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बेळगावचे पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱयांनी भेट दिली. मुख्यमंत्री बोम्मई यांनी मृत्यू झालेल्या मजुरांना तत्काळ 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.