‘हरिहर’वर चढाई करणाऱया 70 वर्षीय आजींनी कोरोनाची लढाईही जिंकली

वर्षभरापूर्वी खडतर असा हरिहर गड चढून नाशिकच्या आशाबाई अंबाडे यांनी सर्वांनाच थक्क केले. हाच मनाचा खंबीरपणा, कमालीची सकारात्मकता त्यांना कोरोनाशी लढतानाही उपयोगात आली. ऑक्सिजनची पातळी 88 पर्यंत खाली उतरली तरीदेखील योग्य उपचारानंतर पाचव्याच दिवशी कोरोना हरला आणि 70 वर्षांच्या या आजी जिंकल्या.

आशाबाई शांताराम अंबाडे असे त्यांचे नाव आहे. त्यांची मुले मनोज आणि संजय यांना ट्रेकिंगची आवड आहे. त्यांच्यासोबत मागील वर्षी आशाबाईंनी न थकता हरिहर गडावर चढाई केली. विशेष म्हणजे चढताना तासभर जंगल तुडवत वाट काढावी लागते. पुढे दोन मोठय़ा खडकांवरील चढाई मोठी अवघड आहे. तरीही दोन तासांत त्यांनी गड सर केला होता.

जुनी मॅट्रिक झाल्यानंतर त्या काही वर्षे मालेगावी शिक्षिका होत्या. लग्नानंतर शेती आणि शिकवणी असा त्यांचा दिनक्रम होता. आता त्यांनी सत्तरीत पदार्पण केले आहे. 20 मार्चला लस घेतल्यानंतर त्यांना ताप आला. दुसऱया दिवशी तो उतरला, पण चौथ्या-पाचव्या दिवशी पुन्हा जाणवू लागला. सोबत अंग आणि डोकेदुखीही होती. ही कोविडसारखी लक्षणे असल्याचा मुलांना संशय आला. मुलगा संजय आणि त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. पुढे एक-एक करत कुटुंबातील नऊजणांना लागण झाली, असे ऍड. मनोज अंबाडे यांनी सांगितले. सुरुवातीला त्यांच्यावर गृहविलगीकरणातच फॅमिली डॉक्टरांकरवी उपचार सुरू होते.

इच्छाशक्तीमुळेच नऊजण कोविडमुक्त

आशाबाई यांची दोन्ही मुले, दोन सुना, चार नातवंडे असे कोरोनाबाधित झाले. आशाबाई वगळता इतर सगळे घरीच उपचार घेत कोविडमुक्त झाले. रुग्णालयातून त्या घरी आल्या तो अंबाडे कुटुंबीयांसाठी आनंद सोहळा होता.

आपली प्रतिक्रिया द्या