श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरांचे संवर्धन कामास 73 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराच्या संवर्धन विकास कामास शासनाने सन 2022-2023 च्या अंदाजपत्रकामध्ये 73 कोटी 80 लाखांची तरतूद केली आहे. शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनी या विषयी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे खूप जूने, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्किटेक्चरल महत्व असणारे मंदिर आहे. मात्र यामध्ये काळाच्या ओघात आणि नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे बरेच बदल झाले असून अनेक ठिकाणी मंदिराचे बांधकाम दुरुस्तीला आले असल्याने गेल्या 50 वर्षापासून मंदिराचा विकास आराखडा प्रस्तावित होता.

कोरोना कालावधीत मंदिर सर्वकष विकास आराखडा तयार करण्याच्या कामासाठी निलम गोऱ्हे यांनी सातत्याने बैठका घेऊन पुरातत्व विभागाला आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर नामांकित सुचीतील वास्तुविशारदाची नियुक्ती करून आराखडा तयार करणे व त्यास पुरातत्व विभागाची मान्यता घेऊन शासन मान्यतेसाठी सादर करे पर्यत आ. गोर्हे यांनी पाठपुरावा केला होता. सदर आराखड्याची अंदाज पत्रकीय रक्कम रू.73.80/- कोटी (पुढील पाच वर्षाच्या अपेक्षित वाढीसह) असून, यानुसार कामे पूर्ण झाल्यानंतर मंदिरास प्राचीन मुळ रूप प्राप्त होणार आहे.

या आराखड्यामध्ये विठ्ठल मंदिर व सभामंडप, रूक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी व नगारखाना, पडसाळ, स्माल टेंम्पल, विनायक मंदिर, व्यंकटेश मंदिर, टेन्साईल वर्क (आतील व बाहेरील), दर्शनबारी, स्ट्रक्चरल ऑडीट, वॉटर सप्लाय व ड्रेनेज, इलेक्ट्रीकल वर्क, साऊंड सिस्टीम, फायर फायटींग सिस्टीम, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, श्री.रोकडोबा मंदिर, श्री.सोमेश्वर मंदिर, श्री.विठ्ठल मंदिर सभामंडप सागवाणी काम, इतर परिवार देवता मंदिरे, कमान बांधकाम व इतर अनुषंगीक कामे प्रस्तावित आहे.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराच्या संवर्धन विकास आराखड्यास शासनाने सन 2022-2023 च्या अंदाजपत्रकामध्ये भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उप सभापती निलमताई गोऱ्हे यांचे आभार व्यक्त केले आहेत.