73 खासगी केंद्रांतील लसीकरण बंद होण्याच्या मार्गावर; पुरेसे डोस मिळत नसल्याने अडचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण 1 मेपासून सुरू करण्याचे जाहीर केले असताना पालिकेला पुरेसे डोस मिळत नसल्याने सद्यस्थितीत सर्व 73 खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद होण्याच्या मार्गावर आहे. पुरसे डोस नसल्यामुळे सध्या केवळ पालिका आणि सरकारच्या लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना डोस दिले जात आहेत.

सद्यस्थितीत पुरेसे डोस येत नसल्याने खासगी केंद्रांना डोस उपलब्ध करून देणे पालिकेला मुश्कील बनले आहे. त्यामुळे 20 आणि 21 एप्रिलला 39 खासगी केंद्रांमध्ये लसीकरण बंद राहिले. यातच डोस कमी असल्याने तुर्तास खासगी केंद्रांना डोस देणे शक्य नसल्याचे पालिकेने स्पष्ट केल्यामुळे सर्व खासगी केंद्रांमधील लसीकरण बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

दररोज एक लाख जणांना लस देता येईल अशी व्यवस्था पालिकेने तैनात ठेवली आहे. 1 कोटी 20 लाख डोस साठवता येतील अशी  कोल्ड स्टोरेज व्यवस्थाही आहे. मात्र मुंबईला पुरेशा प्रमाणात डोस मिळत नसल्याने लसीकरणाला फटका बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्राने आवश्यक त्या प्रमाणात डोस उपलब्ध करून द्यावेत. 

किशोरी पेडणेकर, महापौर