
सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘तितली’ या प्रलयंकारी चक्रीवादळाने आज पहाटेच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. त्यानंतर ओडिशाच्या पूर्व सागरी किनाऱ्याला थडकलेल्या या वादळामुळे या भागातील 3 लक्ष नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.आंध्रच्या श्रीकाकुलाम आणि व्हिझियानगरम जिल्ह्यात ताशी 120 ते 150 किमी इतक्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांनी मोठा उत्पात माजवला. झाडे पडून आणि सुमारे 2 हजार वीजखांब कोसळून झालेल्या दुर्घटनांत 8 जणांचे जीव गेले असून या दोन जिल्ह्यांतील रस्ते वाहतूक पार ठप्प झाली आहे. मृतांत 6 मच्छीमारांचाही समावेश आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या 67 मच्छीमारी नौकांपैकी 65 सुरक्षित किनाऱ्यावर परतल्या असून 2 बेपत्ता नौकांचा शोध सुरू आहे.
‘तितली’ चक्रीवादळाने आज पहाटे उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी ताशी 140 ते 150 किमी या तुफानी वेगाने पार केली. त्यामुळे आंध्रचे दोन जिल्हे आणि ओडिशाच्या 8 जिल्ह्यांत वादळी पावसाने थैमान घातले. ओडिशाच्या गंजम, खुर्धा, पुरी, जगतसिंगपूर, गजपती, केंद्रापारा, भद्रक आणि बालासोर या जिल्ह्यांना ‘तितली’ वादळाने गुरुवारी पहाटे जोरदार दणका दिला. त्यामुळे हजारो घरांचे पत्रे वाऱ्याने उडाले, रस्त्यांवरील विजेचे हजारो खांब आणि झाडे उन्मळून पडली. चक्रीवादळग्रस्त जिल्ह्यांत मदतकार्यासाठी राज्य आपत्ती निवारण दले कार्यरत झाली आहेत. शिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण बलानेही (एनडीआरएफ) आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर बचावकार्य सुरू केले आहे.
ओडिशात 3 लाख नागरिकांसाठी 1112 आश्रय शिबिरे
ओडिशातील किनारपट्टीवरील नागरिकांना तितलीपासून संरक्षण मिळावे म्हणून ओडिशा सरकारने 3 लाख नागरिकांसाठी 1112 आश्रय शिबिरे उघडली आहेत. गंजममधील 105 तर जगतसिंगपूरमधील 18 गर्भवती महिलांना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वादळाच्या प्रभावामुळे ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीवरील शाळा आणि महाविद्यालये पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
आंध्रात 4300 गावे अंधारात
‘तितली’च्या प्रकोपाने आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलाम आणि व्हिझियानगरम जिल्ह्यांत हजारो घरांचे पत्रे उडाले. शिवाय वीजपुरवठा करणारे 2 हजार खांब वादळी वाऱ्याने कोसळले. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील 4319 गावांचा वीजपुरवठा खंडित होऊन ती अंधारात गेली आहेत. खांब कोसळल्याने किनारपट्टीवरील जिल्ह्यांना वीजपुरवठा करणाऱ्या ईस्टर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीचे वीजपुरवठा नेटवर्क पार कोलमडले आहे. या वादळाच्या थैमानामुळे ईस्ट कोस्ट रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वादळाने श्रीकाकुलाम आणि व्हिझियानगरम जिल्ह्यातील भातशेती, केळी, आंबा आणि नारळांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
























































