
सामना ऑनलाईन । मुंबई
वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाच्या निष्काळजीपणामुळे शेकडो विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला होता, मात्र युवासेनेने महाविद्यालय प्रशासनाची ही चूक उघडकीस आणून 800 विद्यार्थ्यांना त्यांना नाहक भरावी लागलेली फी माफ करण्यास महाविद्यालय प्रशासनाला भाग पाडले.
वांद्रे पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात प्रथम सत्रातच ‘सोशलवर्क’ या विषयाचा समावेश करणे आवश्यक होते, परंतु महाविद्यालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सहाव्या सत्राची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सोशलवर्क विषयासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागली. त्यासाठी महाविद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक हजार रुपये फी घेतली.
युवासेनेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात सलग चार तास धरणे आंदोलन केले. त्यावर प्राचार्यांनी आपली चूक मान्य करून विद्यार्थ्यांनी भरलेले पैसे त्यांना परत करण्याचे लेखी आश्वासन दिले. याप्रसंगी सिनेट सदस्य वैभव थोरात, शीतल शेठ, निखिल जाधव, युवासेना कॉलेज कक्ष सचिव गीता कदम, सक्रिय सदस्य सोमनाथ खांडेकर, प्रिन्स चाको, शुभम् सुळकर, किरण पाटील, शाखा समन्वयक अभिषेक गुरव, समीर अदरकर उपस्थित होते.





























































