
16 व 17 मे 2021 रोजी मुंबई किनारपट्टी लगतच्या परिसरातून ‘तौकते’ या चक्रीवादळाने मार्गक्रमण केले. या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव बृहन्मुंबई महानगरपालिका क्ष्रेत्रात दिसून आला. मुंबई महापालिका क्षेत्रात वाऱ्याच्या वेगाने तब्बल 114 किलोमीटर प्रती तास पेक्षा अधिक वेग गाठल्याचे दिसून आले. याच वेगवान वाऱ्यांमुळे महानगरपालिका क्षेत्रात 812 झाडे पडली. यापैकी, 504 झाडे ही खासगी क्षेत्रातील असून 308 झाडे ही सार्वजनिक परिसरातील आहेत. ही झाडे अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सार्वजनिक परिसरात पडली होती. ज्यामुळे वाहतुकीस अडथळा होण्याची शक्यता होती. तथापि, महापालिकेच्या उद्यान विभागाने दिवसरात्र पद्धतीने नियोजन व कार्यवाही करुन ही पडलेली झाडे अल्पावधीत हटवून रस्ते मोकळे केले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी परिसरातील 504 व सार्वजनिक परिसरातील 308; यानुसार एकूण 812 झाडे पडली. यापैकी सुमारे 70 टक्के पडलेली झाडे ही विदेशी प्रजातींची आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोनमोहर , गुलमोहर, गुळभेंडी , रेन-ट्री, रॉयल पाम इत्यादी झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृक्षारोपण करताना प्राधान्याने स्थानिक प्रजातींचीच झाडे लावणे गरजेचे असल्याची बाब यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
16 ते 18 मे 2021 या साधारणपणे 3 दिवसांच्या कालावधी दरम्यान पडलेल्या 812 झाडांमध्ये 249 झाडे ही शहर परिसरातील आहेत. तर 256 झाडे ही पूर्व उपनगरातील असून उर्वरित 307 झाडे ही पश्चिम उपनगरातील आहेत. यापैकी 545 झाडे 16 व 17 मे रोजी पडली. तर 267 झाडे ही 18 मे रोजी पडली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 812 झाडे पडण्याव्यतिरिक्त वादळाच्या प्रभावामुळे 1 हजार 454 झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना देखील घडल्या. यापैकी, 798 फांद्या या खासगी परिसरातील झाडांच्या होत्या. तर उर्वरित 666 फांद्या या सार्वजनिक परिसरातील होत्या.
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 3 जून ते 6 जून 2020 या कालावधी दरम्यान 323 झाडे पडली होती. ज्यापैकी 221 झाडे ही खासगी परिसरातील होती. तर 102 झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती. तर त्यानंतर दिनांक 5 व 6 ऑगस्ट 2020 या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान देखील महापालिका क्षेत्रात वेगवान वाऱ्यांमुळे 355 झाडे पडली होती. ज्यापैकी 179 झाडे ही खासगी परिसरातील होती. तर 176 झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती. या पडलेल्या झाडांमध्ये देखील विदेशी झाडांचे प्रमाणे अधिक होते. या अनुषंगाने नवीन वृक्षारोपण करताना कोणती झाडे लावावीत, याबाबतच्या धोरणाचा अभ्यासपूर्ण पुनर्विचार करुन स्थानिक परिस्थितीनुसार झाडांची निवड करण्याबाबत धोरण ठरविण्याचा विचार करण्यात येईल. तसेच वृक्ष परिक्षणाची (Tree Audit) कार्यवाही देखील नियमितपणे करण्यात येईल, असेही उद्यान विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.



























































