
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार लोकप्रिय घोषणांची तयारी करीत असले तरी सरकारी तिजोरीत मात्र कर्जाचा डोंगर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. या सरकारच्या साडेचार वर्षांच्या काळात कर्जामध्ये तब्बल 49 टक्क्यांनी वाढ होऊन कर्जाची रक्कम 82,03,253 कोटींवर गेली आहे. देशावर कर्जाचे संकट आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारच्या कर्जावर नुकताच स्टेटस रिपोर्ट जारी केला आहे. त्यामध्ये सरकारच्या कर्जबाजारी स्थितीचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत.
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा सरकारी तिजोरी रिकामी आहे, कर्जाचा बोजा आहे असे सरकारकडून सांगण्यात येत होते, मात्र जून 2014 मध्ये सरकारवर 54,90,763 कोटींचे कर्ज होते. सप्टेंबर 2018 मध्ये हे कर्ज 82,03,253 कोटींपर्यंत वाढले आहे. साडेचार वर्षांत कर्जवाढीचे प्रमाण तब्बल 49 टक्के आहे.
सरकारच्या कर्जवाढीमागे पब्लिक डेबिटमध्ये (सार्वजनिक कर्ज) मोठी वाढ हे प्रमुख कारण आहे. साडेचार वर्षांत पब्लिक डेबिट 48 लाख कोटींवरून 73 लाख कोटींपर्यंत वाढले आहे. तसेच मार्केट लोनमध्ये 47.5 टक्क्यांनी वाढ होऊन 52 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
जून 2014 मध्ये गोल्ड बाँडवर कर्जच नव्हते. मोदी सरकारच्या काळात हे कर्ज 9089 कोटींवर गेले आहे.
कर्जाच्या बोजामुळे सरकारची वित्तीय तूटही वाढत आहे. 2018-19 च्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत वित्तीय तूट 7.17 लाख कोटींवर गेली आहे.
आणखी एक लाख कोटी रुपयांचा फटका बसणार
कर्जाच्या डोंगरामुळे सरकारी तिजोरीत पैसे नसले तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे. या घोषणांमुळे देशाच्या तिजोरीला एक लाख कोटींचा फटका बसू शकतो. या घोषणा 1 फेब्रुवारीला मांडल्या जाणाऱया हंगामी अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. शेतकऱयांना व्याजमुक्त कर्ज योजना आणि इतर योजना लागू होतील. तसेच प्रतिहेक्टर अनुदान देण्याचा सरकार विचार करीत आहे. यामुळे 52 हजार कोटींचा सरकारी तिजोरीवर भार पडेल. खासगी आणि औद्योगिक करामध्ये सूट देण्याची घोषणा होऊ शकते. यामुळे 25 हजार कोटी रुपयांचा फटका बसेल असे वृत्त आहे. दरम्यान, सरकारी तिजोरीवर कर्जाचा डोंगर असताना या घोषणांची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्नच आहे.



























































