
जिह्यातील सुमारे 83 सराईत गुन्हेगारांना जिह्यातून हद्दपार करण्यात येणार असून, चौघांवर ‘एमपीडीए’ कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. अधीक्षक ओला यांच्या कारवाईमुळे जिह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
अलीकडच्या काळात जिह्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. याशिवाय खून, दरोडा, लूटमार, जबरी चोरीच्या घटना वाढत आहेत. सराईत गुन्हेगार शस्त्र्ााच्या धाकाने दहशत निर्माण करून सामाजिक शांतता भंग करीत आहेत. त्यांना जिह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधीक्षक ओला यांनी संबंधित पोलीस ठाणे प्रमुखांना दिले होते. पोलिसांनी अशा सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन अधीक्षक ओला यांच्याकडे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यानुसार सुमारे 83 गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार आहे.
अधीक्षक ओला यांनी पडताळणी करून प्रस्ताव प्रांतधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. प्रांतधिकारी यावर निर्णय घेणार आहेत. चौघांवर ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी यावर निर्णय घेणार आहे. दरम्यान, सराईत गुन्हेगारांवर यापुढे अशीच कारवाई करण्यात येणार आहे. आणखी 50 हद्दपार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, त्यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही अधीक्षक ओला यांनी सांगितले.


























































