९२ बेशिस्त वाहनचालकांचे पासपोर्ट अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी , पुणे

बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकविण्यासाठी पोलिसांनी लढविलेली शक्कल कामाला आली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करूनही त्याचा दंड न भरणाऱ्या ९२ जणांचे पासपोर्ट अडकले आहेत. आता या वाहनचालकांना दंड भरल्यानंतरच पासपोर्ट मिळणार आहे. अवघ्या चार दिवसांत ९२ जणांना झटका बसल्याने यातून इतर वाहनचालक तरी शहाणे होणे आवश्यक आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी ऑनलाइन दंडवसुलीची पद्धत अमलात आणल्याने अनेकजण ‘नंतर भरतो,’ असे सांगून निघून जात आहेत. एका वाहनचालकावर अनेक वेळा कारवाई होऊनही दंड भरला जात नसल्याने याची थकबाकी कोट्यवधींच्या घरात गेली आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी वाहनचालकांना मोबाईलवर मेसेज पाठविला जात आहे. तरीही याकडे दुर्लक्ष होत असल्याने यापुढे दंडाची रक्कम न भरणाऱ्यांना पासपोर्ट मिळण्यास अटकाव केला जाईल, असे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. पासपोर्ट कार्यालयाकडून पोलिसांकडे पासपोर्टसाठीचा अर्ज पडताळणीसाठी आल्यानंतर या अर्जदाराकडे वाहतुकीचा दंड थकला आहे का? हे तपासले जात आहे. जर दंड भरलेला नसेल, तर त्याच्याकडून दंड वसूल केल्यानंतरच त्यावर निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांनी चार दिवसांत ९२ जणांची यादी तयार केली असून, या ९२ जणांच्या पासपोर्टच्या प्रक्रियेला अटकाव घातला आहे.

वाहनचालकांनी वाहतूक नियामांचे पालन करून त्यांच्यावर होणारी दंडात्मक कारवाई, तसेच पासपोर्ट आणि चारित्र्यपडताळणीच्या कामांमध्ये होणारा विलंब टाळावा. ‘पुणे ट्रॅफिकॉप डॉट नेट’ या संकेतस्थळावर दंडाची प्रलंबित रक्कम किती आहे, याची खात्री करून ती रक्कम जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.