
गेले दोन दिवस ‘मातोश्री’बाहेर जागता पहारा देणाऱया शिवसैनिकांमध्ये सहभागी झालेल्या एका 92 वर्षीय आजीबाईंनी आज सर्वांचे लक्ष वेधले. ‘फ्लॉवर समझे क्या? शिवसेना फायर है, झुकेगा नही’ असा ‘पुष्पा’ स्टाइल डायलॉग मारत या आजींनी नवनीत आणि रवी राणा दांपत्याला थेट इशाराच दिला. मुंबई शिवसेनेची आहे, तुमची हिंमतच कशी झाली? असा जाबच त्यांनी राणा दांपत्याला विचारला. त्यांना पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून ‘मातोश्री’वर बोलावून घेतले आणि या आजींचे आभार मानले.
या आजींचे नाव आहे चंद्रभागा गणपत शिंदे. शिवडी येथे राहणाऱया चंद्रभागा या कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या हृदयात आहेत असे त्या अभिमानाने सांगतात. ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणाऱया राणा दांपत्याविरुद्ध शिवसैनिक आक्रमक झाले होते. गेले दोन दिवस शिवसैनिकांनी ‘मातोश्री’बाहेर तसेच राणा दांपत्याच्या निवासस्थानाबाहेर ठाण मांडले होते. त्यांच्यासोबत या चंद्रभागा आजीही जोरदार घोषणा देत होत्या.
आजींना घोषणा देत असल्याचे पाहून शिवसैनिकांनीही ‘आजी आमची फायर आहे, रवी राणा कायर आहे’ अशी घोषणाबाजी केली. या आजींनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले. प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘रवी राणा दोन दिवस ‘मातोश्री’वर आमच्या वहिनींना आणि सगळय़ांना त्रास देत आहे. त्याला आम्ही चांगलाच इंगा दाखवणार आहोत. साहेबांसाठी आम्ही झटणार. त्यांना वाटतं दोघेजण येऊ आणि गुपचूप जाऊ काय. आमच्या समोर या. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले आहे. हरणार नाय. ‘मातोश्री’वर येऊन दाखवाच,’ असा दमही या आजींनी राणा दांपत्याला दिला.
उद्धव साहेबांनी आभार मानले, म्हणाले ‘काळजी घ्या’
चंद्रभागा आजींचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केला आणि ‘मातोश्री’वर बोलावून घेतले. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या की, तुमच्यासाठी आम्ही इथे बसलो आहोत साहेब. ती कशी येतेय ते बघू आम्ही. मी इथेच बसणार. तुम्हाला कुणी काही बोलले तर आम्ही गप्प बसणार नाही.’ असे सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपले आभार मानले आणि म्हणाले की, ‘काळजी घ्या. फारवेळ बसू नका. चहापाणी झालं का’ असे चंद्रभागा यांनी सांगितले.
































































