
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेला रणगाडा ‘अर्जुन एम के-२’ यावरून लवकरच क्षेपणास्त्राची चाचणी घेतली जाणार आहे. सुखोई विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आता अर्जुन रणगाड्यातून क्षेपणास्त्र चाचणी घेतली जाणार आहे. रणगाड्यातून डागण्यात येणार असलेल्या क्षेपणास्त्राचा पल्ला १२०० मीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल. या संदर्भात लवकरच डीआरडीओकडून अधिकृतरित्या माहिती दिली जाणार आहे.
शत्रूचे बंकर अथवा एखादे महत्त्वाचे ठिकाण, दहशतवाद्यांचा अड्डा नष्ट करण्याच्या उद्देशाने लष्कराला रणगाड्यावरुन डागता येतील अशी छोट्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे हवी आहेत. लष्कराने सध्या १२०० मीटर ते ५ किमी या पल्ल्याचा विचार करुन डीआरडीओकडे क्षेपणास्त्राची मागणी केली आहे. याआधी लष्कराने इस्रायली बनावटीचे क्षेपणास्त्र लहाट (लेझर होमिंग अँटी टँक) चा विचार केला होता. मात्र हिंदुस्थानी लष्कराच्या सर्व गरजा पूर्ण होत नसल्यामुळे हे क्षेपणास्त्र नाकारण्यात आले होते. इस्रायली क्षेपणास्त्र नाकारण्यात आल्यानंतर २०१३ पासून अर्जुन रणगाड्यावरील क्षेपणास्त्राच्या विकासाचा कार्यक्रम रखडला होता. आता या कार्यक्रमाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे.

























































