आंघोळीसाठी नदीत उतरलेल्या दोन बहिणी बुडाल्या, एकीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

शास्त्री नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या दोन सख्ख्या बहिणी भरतीच्या पाण्यात बुडाल्या. यातील एका चिमुरडीचा मृत्यू झाला तर दुसरीला गंभीर अवस्थेत रत्नागिरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. पूर्वा विजय कांजिया (८) ही मयत झाली असून जयश्री विजय कांजिया (१२) हिच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू आहेत. या दोघीही संगमेश्वर केंद्रशाळेच्या विद्यार्थिनी आहेत.

संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमेश्वर परिसरात मसाला विक्रीचा व्यवसाय करणारे विजय कांजिया आपल्या कुटुंबियांसह संगमेश्वर रामपेठ येथे राहतात. त्यांच्या पूर्वा आणि जयश्री या दोन मुली सोमवारी दुपारी शास्त्री नदीत आंघोळीसाठी गेल्या होत्या. ज्यावेळी त्या पाण्यात गेल्या त्यावेळी खाडीत भरती सुरु होती यामुळे अचानक पाणी वाढू लागले. याचा अंदाज न आल्याने दोघीही खोल पाण्यात वाहू लागल्या. मुलींचा आरडाओरडा ऐकून शेजारच्या ग्रामस्थांनी पाण्यात उडी घेतली, परंतु तोपर्यंत पूर्वा खोल पाण्यात वाहून गेली तर जयश्री ग्रामस्थांच्या हाताला लागली. तिच्या नाका तोंडात पाणी गेल्याने तिला तत्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नंतर रत्नागिरीत हलवण्यात आले. तिची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, पूर्वाचा शोध घेणाऱ्या ग्रामस्थांना काही अंतरावर तिचा मृतदेह सापडला.