
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलढाणा जिल्हा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे पार्थिव गुरूवार दुपारी ४ वाजता खामगाव येथील वसुंधरा या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या शुक्रवारी १ जून रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पसच्या प्रांगणामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे आज पहाटे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबईहुन विमानाने अकोला व नंतर खामगाव येथे आणण्यात आला. त्यांना आज गुरुवारी दुपारी ४ वाजता पासून निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या १ जून शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या निवासस्थानावरुन निघुन भाजप कार्यालय, गांधी बगीचा, कमाणी गेट, एकबोटे चौक, भगतसिंग चौक, फरशी, मेनरोड, टिळक पुतळा, चांदमारी, शेगांव नाका, शेगांव रोड ने मार्गक्रमण करीत सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पसच्या प्रांगणामध्ये पोहचेल. सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत असे भारतीय जनता पार्टी खामगांव यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. दरम्यान फुंडकर यांच्या निवासस्थानी शोकाकूल कार्यकर्ते व चाहत्यांची गर्दी आहे. फुंडकर यांच्या निधनाने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आज शोककळा पसरली असून खामगावात अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवून शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.





























































