आजचा अग्रलेख-पालघरचा निकाल मोठ्या विजयाची सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघरमधील ‘ईव्हीएम’ने मिळवून दिलेला विजय सोडला तर भाजपच्या हाती देशभरात धुपाटणेच लागले आहे. या निकालाचे विश्लेषण ज्यांना करायचे आहे त्यांनी करावे. आमच्यासाठी हा निकाल म्हणजे २०१९ च्या मोठ्या विजयाची सुरुवात आहे. पालघर आम्ही स्वतंत्रपणे लढलो. ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप होणे गरजेचे होते, पण निवडणूक शिवसेना विरुद्ध भंगार ‘ईव्हीएम’ अशी झाली. त्यामुळे विजयी मिरवणूक काढायचीच असेल ती निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा व ‘ईव्हीएम’ची काढा! आम्ही ताकदीने व स्वाभिमानाने लढलो. शिवसेना समाधानी आहे!

देशभरातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाचा पाडाव झाला आहे. पालघरचा विजय हा निवडणूक आयोगाशी ‘युती’ करून घोषित करण्यात आला आहे, पण विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपास लोळवले आहे. तेथे एकास एक लढत झाली. उत्तर प्रदेशातील ‘कैराना’ लोकसभेतील मतदारांनी योगी आदित्यनाथांचा दारुण पराभव केला. शिवाय देशभरातील ९ पैकी ८ विधानसभा मतदारसंघांत भाजपाने पराभवाची माती खाल्ली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता सांगितले, भंडारा-गोंदिया आम्ही २०१९ मध्ये जिंकू. आम्हीही सांगतोय पालघर लोकसभा मतदारसंघावर २०१९ मध्ये शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल. महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन निवडणुका झाल्या, पण ‘साम-दाम-दंड-भेद’ वगैरे मस्तवाल नीतीचा वापर झाला तो फक्त पालघरमध्येच. पालघरात काँग्रेसचे नेतेच भाजपचे कमळ घेऊन जिंकले. हा विजय सोपा नव्हता. या विजयासाठी गावीत व त्यांच्या पाठीराख्यांना जो संघर्ष करावा लागला तो थक्क करणारा होता. एक तर स्वतःच्या हिंदुत्ववादी विचारांचा ‘भाजपाई’ उमेदवार शोधताना भारतीय जनता पक्षाची दमछाक झाली. त्यामुळे काँग्रेसचे भ्रष्ट राजेंद्र गावीत यांना कमळपाकळय़ांचे दुग्धस्नान करून त्यांनी पावन करून घेतले. मग त्यांना हळद लावून घोड्य़ावर बसवले. तरीही घोडा पुढे पाऊल टाकीना. तेव्हा नवरदेवाच्या वरातीतील बॅण्डबाजा पथक व नाच्यांनी संपूर्ण पालघरात पैशांचा धो धो पाऊस पाडला. पैशाने भागले नाही तेव्हा आदिवासी पाड्य़ांवर दारूवाटप केले. हा इतका सरंजाम व थाटमाट करूनही भाजपने भाड्य़ाने घेतलेला काँग्रेसचा घोडा जागचा हलायला तयार नव्हताच. तेव्हा निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणेस वरातीत उतरवले व शेवटी ‘ईव्हीएम’ची भंगार यंत्रणा हाताशी धरून

काँग्रेसचे घटस्फोटित
राजेंद्र गावीत यांना विजयाची वरमाला घालण्यात आली. अशा तऱ्हेने भाजपाची मेहनत फळास आली नसती तरच नवल होते. निवडणुकांचा कौल हा तसा मान्य करण्यासाठीच असतो, पण पालघरचा कौल हा ‘ईव्हीएम’ बनवाबनवीचा कौल आहे व तो कौल स्वीकारण्यास पालघरची जनताच काय तर संपूर्ण महाराष्ट्र तयार नाही. ऐन मतदानाच्या पहिल्या चार तासांत शंभरावर ईव्हीएम मशीन्स बंद पडल्या व मतदानासाठी उन्हात उभे राहिलेल्या पन्नास-साठ हजार मतदारांना त्यांचा हक्क बजावता आला नाही. ते मतदार कंटाळून परत गेले. हा पन्नास-साठ हजार मतदारांना परत पाठवण्याचा ‘डाव’च भाजप पुरस्कृत काँग्रेस गावितांना विजयाकडे घेऊन गेला. मतदान संपल्यावर ४६ टक्के मतदान झाल्याचा अधिकृत सरकारी आकडा बाहेर आला, पण नंतरच्या बारा तासांत हा आकडा स्वतः निवडणूक आयोगाने बदलला व ५३ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. बारा तासांत असा कोणता खेळ झाला की ७ टक्के मतदान वाढले? ते वाढलेले मतदान म्हणजे त्या रात्री केलेला जादूटोणाच होता. त्यामुळे इतके अथक परिश्रम घेतल्यावर खऱया लोकशाहीचा पराभव होणे व भाजपचे काँग्रेसवाले गावीत जिंकणे यात नवल ते कसले? पालघरात शिवसेना एकाकी व एकहाती लढली व साम-दाम-दंड-भेदवाल्यांना तसे लोळवलेच. खरे म्हणजे २०१९ च्या निवडणुकीचे चित्र नेमके काय असेल तेच पालघरच्या या पोटनिवडणुकीने स्पष्ट केले आहे. शिवसेना या वेळी जिंकू शकली नाही, पण भाजपवाले विजयासाठी जे ‘वाममार्ग’ आतापर्यंत वापरत आले त्याचा पर्दाफाश या निमित्ताने झाला. पुन्हा मतविभागणी ही जणू ठरवूनच करण्यात आली की काय अशीही शंका येते. तिकडे कैरानात योगी म्हणवून घेणाऱ्या

आदित्यनाथांचा दारुण पराभव
सर्व विरोधकांनी एकत्र येऊन केला. कैरानात भाजपचे खासदार हुकूम सिंग यांच्या निधनानंतर त्यांची कन्या मृगांका सिंगला उमेदवारी दिली. त्या मृगांका सिंगही पराभूत झाल्या. मृगांका सिंग विजयी व्हाव्या म्हणून स्वतः पंतप्रधान कैरानाच्या सीमेवर ‘रोड शो’ वगैरे करीत होते. तरीही राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सुम हसन या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. उत्तर प्रदेशातीलच नुरपूर विधानसभेतही भाजपचा पराभव झाला. तेथे समाजवादी पक्षाचे नैमूल हसन विजयी झाले. सांगलीतील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजीत कदम आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. पश्चिम बंगालच्या महेशताला विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप पराभूत झाला. कर्नाटकातील राजराजेश्वरी नगर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे मुनिरथ विजयी झाले. बिहारमधील जोकीहाट मतदारसंघात लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने सत्ताधारी संयुक्त जनता दलाचा पराभव केला. झारखंड, मेघालय, केरळ विधानसभा पोटनिवडणुकाही भाजपने गमावल्या आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील पालघरमधील ‘ईव्हीएम’ने मिळवून दिलेला विजय सोडला तर भाजपच्या हाती देशभरात तसे धुपाटणेच लागले आहे. या निकालाचे विश्लेषण ज्यांना करायचे आहे त्यांनी करावे. आमच्यासाठी हा निकाल म्हणजे २०१९ च्या मोठ्य़ा विजयाची सुरुवात आहे. पालघर आम्ही स्वतंत्रपणे लढलो. ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप होणे गरजेचे होते, पण निवडणूक शिवसेना विरुद्ध भंगार ‘ईव्हीएम’ अशी झाली. त्यामुळे विजयी मिरवणूक काढायचीच असेल ती निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा व ‘ईव्हीएम’ची काढा! आम्ही ताकदीने व स्वाभिमानाने लढलो. शिवसेना समाधानी आहे!