
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक असणार आहे. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे आज तिन्ही मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही उशीराने धावणार आहेत, त्यामुळे आज रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगावपर्यंत जलद व धिम्या दोन्ही मार्गांवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गावरून धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणाार असून या दरम्यान सर्व जलद गाड्या धिम्या गाड्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. ब्लॉकच्या काळात विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांत काही गाड्या थांबविण्यात येणार नाहीत.
हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रेदरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी कुर्ला ते पनवेलपर्यंत विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. या कालावधीत हार्बरच्या प्रवाशांना ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेवरून हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.































































