जुन्या मित्रपक्षांना भाजपकडून चांगली वागणूक नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराड

‘भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालून त्यांना क्लीनचीट मुख्यमंत्री देतात यामुळे मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळणार नाही, तर कोर्टात जाऊन न्याय मागितला पाहिजे. पालघरमध्ये भाजपने काँग्रेसचा उमेदवार पळवला, साम, दाम, दंड, भेद अशी भाषा भाजपला वापरावी लागली यामुळे शिवसेना त्यांच्यापासून दुरावली आहे. जुन्या मित्रपक्षाला भाजप चांगली वागणूक देत नाही. अहंकार व घमेंड भाजपमध्ये वाढली’, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. कराड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

मोदीचे सरकार नाही तर हुकुमशाही

‘पंतप्रधान मोदी यांची स्टाईल व सरकारचा चालावण्याची पद्धत ही हुकुमशाही पद्धतीचे व एकाधिकारशाहीची असल्याचे दिसते. लोकशाही चालवण्यासाठी ज्या संस्था निर्माण झाल्या आहेत. त्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून केला जात आहे,’ असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरातील समविचारी पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी निर्माण केली जाणार आहे. भाजपला राज्यसभेत बहुमत मिळाले तर असणारे कायदे रद्द करतील, अशी भीतीही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. २०१९ ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप व मोदीला रोखण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत.

देशातील चित्र बदलत आहे…

‘शिवसेना हा भाजपचा जुना मित्रपक्ष आहे त्यांनाही चांगली वागणूक दिली जात नाही. मोदींवर नाराज होऊन चंद्राबाबू नायडू बाहेर पडले आहेत. मोदींना देशाचा इतिहास माहrत नाही, आर्थिकबाबत काही कळत नाही’, असाही आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला आहे. पोटनिवडणुकांचे निकाल पाहता देशातील चित्र बदलत आहे. भाजप पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार नाही, लोक आता भाजपला वैतागले आहेत. ना खाऊंगा, ना खाने दुंगा याचबरोबर जी आश्वासने भाजपाने दिली ती गेली चार वर्षांत भाजप सरकारने पूर्ण केलेली नाहीत, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.