एस. टी. कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुखेड

एस.टी. महामंडळाच्या कामगार संघटनांनी वेतनवाढ मान्य नसल्याचे कारण पुढे करुन अचानकपणे अघोषित संप सुरु केला, मात्र एस. टी. कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून पोलीस बंदोबस्तात बसेस आगाराच्या बाहेर काढून वाहतूक सुरळीत सुरु केली. त्यामुळे सर्वच मार्गावरील बस वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांनी व बि-बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ जाहीर केली, त्यामुळे बहुतांश कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र कामगार संघटना, एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही वाढ मान्य नसल्याचे कारण पुढे करुन अचानकपणे अघोषित संप सुरु केला. दरम्यान प्रवाशी नेहमीप्रमाणे बसस्थानकात आले असता बसस्थानकावर एकही बस नव्हती. त्यामुळे प्रवाशी भांबावले. सकाळी ५ ते ९ पर्यंत एकही एसटी आगाराच्या बाहेर निघाली नाही. शेकडो प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यातच पाऊस चांगला झाल्याने शेतकरी बि-बियाणे घेवून गावाकडे जाण्यासाठी थांबले होते.

शिवसेनेच्या एस.टी.कामगार सेनेचे पदाधिकारी प्रताप कोल्हे, एन.पी.शेटवाड, बालाजी रिंदकवाले, भगवान रोडगे, बालाजी नगरे, मनोज कांबळे, सूर्यकांत बेळगे यांनी पुढाकार घेवून बसेस सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काही कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचा विरोध करताच कामगार सेनेने आगार व्यवस्थापक एस. टी. शिंदे यांना पोलीस बंदोबस्तात बसेस सुरु करण्याची मागणी करताच पोलीस बंदोबस्त मागवून आगाराच्या बाहेर बसेस काढल्या. दरम्यान कामगार सेनेने प्रवाशांच्या सोयीसाठी व त्यांचे हाल थांबवण्यासाठी पुढाकार घेवून नांदेड, उदगीर, देगलूर, लातूर, शिरुर ताजबंद या मार्गावरील बसेस काढून दिल्या. सकाळी नऊनंतर बसेसची वाहतूक सुरळीत सुरु झाली.

बसेस सुरळीतपणे चालण्यासाठी कामगार सेनेचे एन.पी.शेटवाड, बालाजी रिंदकवाले, बालाजी नगर, सहायक वाहतूक निरीक्षक एन.पी.कोरे, वाहतूक नियंत्रक एस.टी. जाधव, वाहतूक निरीक्षक एम.एल.गायकवाड, एस.ए.तुरटवाड, सुर्वेसे, जोगदंड, मनोज कांबळे, मेकलवाड, कागणे, पटणे, गायकवाड, तुपेकर, बालाजी गुंडेवार, तळणे आदी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.