
सामना प्रतिनिधी । मुंबई
वाटेल त्या थराला जाऊन लोकांकडून दांडगाईने पैसे उकळायचे काम क्लीनअप मार्शलचे सुरू आहे. कुर्ला टर्मिनस येथे एका तरुणाला मारहाण आणि चाकूचा धाक दाखवून दोघा क्लीनअप मार्शलनी लुटल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ‘तुझ्याकडे गुटखा आहे’ अशी जबदस्तीने बोंब करीत गावाला निघालेल्या तरुणाजवळचे १२ हजार त्या दोघांनी लुटून नेले, मात्र हा प्रकार कळताच टिळक नगर पोलिसांनी नागरिकांना दमदाटी करून लुटणाऱया त्या भामट्यांच्या मुसक्या आवळल्या.
शाबुद्दीन खान (२१) आणि गणेश आनंद बलराम ऊर्फ बल्लू (३१) अशी या दोघांची नावे आहेत. पालिकेने कॉण्ट्रक्ट दिलेल्या ट्रिगर कंपनीसाठी हे दोघे क्लीनअप मार्शल म्हणून काम करीत होते. ५ जून रोजी सकाळी १० च्या सुमारास रमेश चौहान (२८) हा तरुण यूपीला जाण्यासाठी कुर्ला टर्मिनसच्या दिशेने पायी जात होता. तेवढय़ात मोटारसायकलवरून शाबुद्दीन आणि गणेश मागून आले आणि त्यांनी रमेशला थांबवले. ‘तू गुटखा खातो, तुझ्या खिशात गुटखा आहे’ असे बोलून ते रमेशचे जबरदस्ती खिसे तपासू लागले. त्याला रमेशने विरोध करताच दोघांनी त्याला दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतक्यावर न थांबता रमेशला मारहाण करून शाबुद्दीनने त्याला चाकूचा धाक दाखवला तर गणेशने जबरदस्ती त्याच्या खिशातील पाकीट घेतले आणि त्यातील १२ हजार काढून दोघांनी पळ काढला. याप्रकरणी गणेशने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे आणि पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल अंबवणे, अंमलदार तानाजी सुळे, केशव यांनी आरोपींचा शोध सुरू केला.
परप्रांतीय नागरिक टार्गेट
परप्रांतातून आलेल्या नागरिकांना क्लीनअप मार्शल जाणीवपूर्वक टार्गेट करतात. तुम्ही थुंकलात, सिगारेट ओढलीत, गुटखा खालात असे वाटेल ते कारण सांगून क्लीनअप मार्शल दमदाटी करतात. इतके करून थांबत नाही तर शिवीगाळ आणि दादागिरी करून जबरदस्ती वसुली करतात. मराठी नागरिकाला फारसे लक्ष्य करीत नाहीत, मात्र बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना लुटायचे असेच क्लीनअप मार्शलचे काम सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गणेश सराईत गुन्हेगार तरीही क्लीनअप मार्शल
मी गुटखा खात नसून थुंकलोही नाही. शिवाय माझ्याकडे गुटखाही नाही. मात्र तरी दोघा क्लीनअप मार्शलनी मला मारहाण करून माझे पैसे लुटल्याचे रमेशने पोलिसांना सांगितले. अमोल अंबवणे यांनी लगेच घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्या भामटय़ा क्लीनअप मार्शलच्या मोटारसायकलचा नंबर हाती लागला. त्याआधारे अंबवणे, सुळे व यांनी शोधाशोध करून गोवंडीत शाबुद्दीनला पकडून मग गणेशच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून १२ हजारांची रोकड हस्तगत केली. गणेश हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्या विरोधात चार गुन्हे दाखल आहेत, मात्र तरी तो क्लीनअप मार्शल म्हणून काम करीत होता.


























































