सामना प्रतिनिधी । महाड
सुशिक्षित पदवीधर मतदारांचा विश्वास केवळ शिवसेनेवरच आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघावर भगवाच फडकेल आणि या मतदारसंघातून शिवसेनेचाच आमदार विधान परिषदेवर निवडून जाईल, असा विश्वास शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
कोकण पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात पदवीधरांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, रायगड जिह्यात ५ हजार १४१ पदवीधर मतदार आहेत. यातील पन्नास टक्क्यांहून अधिक नोंदणी शिवसेनेने केली आहे. शिवसेना जिद्दीला पेटली तर काय करू शकते हे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे मुंबई, कोकणसह चार ठिकाणी शिवसेनेचेच शिलेदार निवडून जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाणे महापालिकेच्या महापौरपदावर काम केलेल्या आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अभ्यास असलेल्या संजय मोरे यांनाच निवडून द्या, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, आमदार भरत गोगावले, परभणीचे आमदार राहुल पाटील, कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय मोरे, दक्षिण रायगडचे संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, महिला आघाडी संपर्कप्रमुख सुवर्णा करंजे, उपजिल्हाप्रमुख बिपीन महामूणकर, दक्षिण रायगड महिला आघाडीप्रमुख अनिता पवार, युवासेनेचे अमोल किर्तीकर, विकास गोगावले यांच्यासह युवासेनेचे असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.





























































