
सामना प्रतिनिधी। पारनेर
नगर – पुणे महामार्गावरुन पुण्याकडे जाणा-या कारने पुढे जाणाऱ्या मालमोटारीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात काका पुतण्यांचा मृत्यू झाला आहे. यात कार चालक गंभीर जखमी झाला आहे. नगर तालुक्यातील चास शिवारात रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हाी दुर्घटना घ़डली आहे. प्रशांत गणपत मापारी (२९) व सुमित संदीप मापारी (११) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही काका पुतणे असून राळेगणसिद्धीचे रहिवासी आहेत.
प्रशांत यांचे मोठे बंधू व सुमितचे वडिल संदीप हे जम्मू येथे सीमा सुरक्षा दलात नोकरीस आहेत. महिनाभराची सुट्टी संपवून संदीप रविवारी रात्री ८.३० च्या जम्मू तावी एक्सप्रेसने पुन्हा जम्मूला जाणार होते. त्यांना नगर येथील रेल्वे स्थानकावर सोडून प्रशांत, ,सुमित व संदीप यांचा मेहूणा भाऊसाहेब कर्डीले वॅगन आर कार मधून घराकडे परतत होते. नगर शहर, केडगांव व चास ओलांडल्यानंतर अदित्यनराजे हॉटेलजवळच्या कारने पुढे चालेल्या मालमोटारीस जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात कारचा अशरक्षः चक्काचूर झाला. यात चालकाशेजारील सीटवर बसलेले प्रशांत मापारी यांचा जागीच मृ्त्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सुमितचा नगर येथे उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. तर चालक भाऊसाहेब हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी सकाळी दोन्हीही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी राळेगणसिद्धीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान जम्मूकडे निघालेले संदीप यांना या अपघाताची माहीती कळवण्यात आल्यानंतर त्यांनी भुसावळ येथे उतरून पुन्हा राळेगणसिद्धीकडे प्रयाण केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह राळेणसिद्धी परिवाराचे सदस्य यावेळी उपस्थित हाते. या दुर्घटनेमुळे राळेगणसिद्धीत सर्व व्यवहार बंद ठेऊन हरताळ पाळण्यात आला.


























































