
प्रसाद नायगांवकर, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील तेजापूर मधल्या गावकऱ्यांनी अवघ्या ९६ तासांमध्ये पूल उभा करत एकजुटीचं आणि प्रबळ इच्छाशक्तीचं दर्शन घडवलं आहे. या गावाला जगाशी जोडणारा एकमेव पूल आहे. मुसळधार पाऊस पडला की हा पुलावरचा रस्ता बंद व्हायचा. शेती व इतर कामांसाठी या पुलाशिवाय इथल्या लोकांना दुसरा कोणताही पर्याय नव्हता. सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेंद्र लोढा यांना ही बाब कळाली त्यांनी थोडी आर्थिक मदत देण्याचं कबूल केलं, मात्र पूल हा पैशांच्या जोरावर नाही तर मेहनतीच्या जोरावर उभा राहील असं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं. गावकऱ्यांनी मेहनत करू पण पूल बांधू असा निश्चय केला. त्यांच्या निश्चयामुळे डॉ.लोढा यांनी आर्थिक मदत तर केलीच शिवाय स्वत:ही श्रमदान केलं. सगळ्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे आता जुन्या पुलाच्या जागी उंच, रुंद आणि भक्कम पूल उभा राहीला आहे. या वर्षापासून पावसाळा ते दिवाळीपर्यंतच्या काळात आम्ही जगापासून तुटणार नाही अशी भावना इथल्या गावकऱ्यांनी बोलून दाखवली आहे.




























































