उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळा भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महिना-दीड महिना असलेला शुकशुकाट किलबिलाटामध्ये बदलणार आहे. उन्हाळ्याची सुट्टी संपली असून आज शुक्रवारी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने थोडीशी धाकधूक असली तर नवीन कपडे, नव्या वह्या-पुस्तकांचा सुगंध यामुळे मुलांमध्ये उत्साह ही तितकाच आहे. शाळेचा पहिला दिवस म्हटला की कुठे थोडं हसू तर कुठे रडू हे दिसणारच.

मे महिन्याच्या सुट्टीनंतर १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात होत आहे. शाळेचे कपडे, पावसाळी चप्पल, रेनकोट, छत्र्या, दप्तरे, वह्या-पुस्तके सर्व खरेदी करून मुले आणि त्यांचे पालकही तयारीत आहेत. नवीन वर्ग, नव्या वर्गातील नवे सवंगडी कसे असतील, शाळेचा पहिला दिवस कसा जाईल, कोणत्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न मुलांच्या मनात पडले असून या सर्वांचे उत्तर उद्या शुक्रवारीच मिळेल.

प्रवेशोत्सव साजरा होणार
विद्यार्थ्यांना शाळेची आणि अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा केला जातो. फुले देऊन मुलींचे स्वागत केले जाते. रांगोळ्या आणि इतर सजावटीने शाळेचा परिसर सजविला जातो. मुलांना गोडधोड खाऊ घातले जाते. त्यामुळे पहिल्या दिवसाचा अनुभव घेण्यासाठी मुलांमध्ये टेन्शनपेक्षा उत्सुकताच अधिक आहे.