
सामना ऑनलाईन । श्रीनगर
‘रायझिंग काश्मीर’ वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारींच्या हत्या प्रकरणात आज मोठा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच महाराजा हरिसिंग हॉस्पिटलमधून पळालेला ‘लश्कर ए तोयबा’चा नवीद जट हा या कटाचा मास्टरमाइंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. अबू उसामा व मेहराजुद्दीन बंगारू हे लश्करचे अतिरेकी या कटात सहभागी होते. एवढेच नाही तर चौथ्या अतिरेक्याचेही फुटेज समोर आले आहे. दरम्यान, शुजात बुखारी यांना हजारोंच्या उपस्थितीत सुपूर्द ए खाक करण्यात आले.
काश्मीरात शांततेसाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची काल अतिरेक्यांनी गोळ्य़ा घालून हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आज समोर आले असून गोळीबार करणाऱया तीन अतिरेक्यांची ओळखही पटली आहे. या अतिरेक्यांनी शुजात यांच्यावर अक्षरशः गोळ्य़ांचा वर्षाव केला. त्यांना पंधरा गोळय़ा लागल्या आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
शोकाकुल वातावरणात दफनविधी
बारामुल्ला या मूळ गावी शुजात बुखारी यांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. बुखारी यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने कश्मिरी सामील झाले होते. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह राज्याचे मंत्री दफनविधीसाठी उपस्थित होते.


























































