
सामना ऑनलाईन । मुंबई
गुन्हा घडल्यावर पोलीस आरोपीला शोधून काढतातच. पण गुन्हेगाराला अटक केल्यानंतर त्या गुह्यांचा तपास उत्कृष्टपणे केल्यास आणि त्याला पुराव्याची जोड मिळाल्यास तसेच न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकीलही तितकाच तरबेज निघाला की आरोपी दोषी सिद्ध होतोच. इतकेच नाही तर त्याला कठोर शिक्षाही होते. याचा प्रत्यय खेड तालुक्यातील तिहेरी हत्याकांडात आला. या हत्याकांडातील मुख्य आरोपी अशोक ढवळे याला अलिबागच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली.
पेण येथील मालदीव शेडाशी या गावी अशोक ढवळे हा काकांकडे राहत होता. अशोक याचे मूळ गाव खेड तालुक्यातील शिरगाव हे आहे. काकांकडे राहून अशोक नोकरी करीत होता. याचदरम्यान या गावातील मनीषा सावंत या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले, मात्र मनीषाच्या घरच्यांना व गावकऱयांना हे मान्य नव्हते. त्यांनी अशोकला गावाबाहेर काढले. तरीही तो मनीषाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता. मुलीच्या इच्छेखातर तिची आई लीलाबाई ही अशोकच्या मूळ गावी त्याचे घर पाहण्यासाठी गेली. अशोकचे गाव दुर्गम भागात असल्याने मुलीचे हाल होतील म्हणून लीलाबाई यांनी दोघांच्या लग्नास नकार दिला. गावातून बाहेर काढल्यामुळे नोकरी गेली आणि आता मनीषाही भेटणार नाही या विचाराने अशोक संतापला. त्याने लीलाबाई हिची हत्या करून मृतदेह रघुवीर घाटात फेकून दिला. आई घरी परतली नाही म्हणून मनीषाने अशोकला कॉल केला. थातुरमातुर कारण सांगून अशोकने मनीषालाही शिरगावात बोलावले. लहान बहीण पूनम हिला सोबत घेऊन मनीषा शिरगावात पोहचली. अशोकने आईला ठार मारल्याचे सांगताच मनीषा त्याला घेऊन आईचा मृतदेह पाहण्यासाठी रघुवीर घाटात गेली. तुझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात जाते असे मनीषा सांगू लागताच अशोकचा राग अनावर झाला. जीवापाड प्रेम केलेल्या मनीषा आणि १२ वर्षांच्या बहिणीलाही ठार करून त्याच घाटात फेकले. त्याचा राग इथवरच शांत झाला नाही. मनीषाच्या मोठय़ा बहिणीलाही त्याने बोलावले. पण तिने आई व बहीण हरवल्याची तक्रार आधीच केली होती. अशोकने केलेल्या कॉलची माहिती देताच पेण पोलिसांनी त्याला अटक केली.
पेण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी या गुह्याचा तपास हाती घेत आवश्यक पुराव्याची जमवाजमव केली. १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ऍड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली. उत्कृष्ट तपास, पुराव्याची योग्य जुळवाजुळव, साक्षीदारांच्या नोंदी आणि न्यायालयात मांडलेली बाजू या जोरावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु. गो. सेवलीकर यांनी अशोकला जन्मठेप आणि पाच हजार दंड ही शिक्षा सुनावली.


























































