
सामना ऑनलाईन । पनवेल
ओला कॅब बुक करायची, कारमध्ये बसून थोडय़ा अंतरावर गेल्यावर कार उभी करायला लावायची. आजूबाजूला कोणी नसल्याची खातरजमा करून चालकाला मारहाण करून लुटायचे आणि पसार व्हायचे. अशा प्रकारे लुटमार करून मिळालेला पैसा उडविण्याआधीच पनवेल पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या.
नवी मुंबईत राहणाऱया तिघांनी नेरूळहून उलटा नोड येथे जाण्यासाठी ओला कॅब बुक केली. कार आल्यानंतर तिघे त्यात बसले, पनवेल येथील गव्हाणपाडा परिसरात गेल्यानंतर तिघांनी कार बाजूला घ्यायला सांगितली. तिघांनी कारचालक अजगर अली अकबर शेख याला मारहाण करून त्याच्याकडील नऊ हजारांचा मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून पळ काढला. चालकाने याबाबत पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील तारमळे, अंमलदार आयरे, राऊत, थोरात, वाघमारे, घुले या पथकाने तपास सुरू केला.
तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यानंतर कार चालकाला लुटणारे विजय जाधव, निखिल सातपुते आणि इम्रान झाकीर शेख हे तिघे असल्याचे समजताच पोलिसांनी तिघांना पकडले. दारूची नशा करण्यासाठी झटपट पैसा कमाविण्यासाठी तिघांनी कार चालकाला लुटण्याची आयडिया सुरू केली होती, पण पनवेल पोलिसांनी तिघांना वेळीच पकडून त्यांचे मनसुबे उधळून लावले.






























































