
सामना प्रतिनिधी, जळगाव
भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून राज्यासह जिल्ह्यात अवैध धंद्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा भाजपचे अध्यक्ष उदय वाघ हे अवैध धंदे वाल्यांना संरक्षण देण्यासाठी पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केला.
आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, अमळनेर येथील अनिल भाईदास पाटील, कल्पना पाटील, मंगला पाटील आदी उपस्थित होते. नवाब मलिक पुढे म्हणाले की, अमळनेर येथील राजेश कंजर नावाच्या इसम ११६ किलो गांजासह पकडला गेला होता. त्याच्याकडून गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी म्हणून उदय वाघ यांनी १० लाख रुपयांची मागणी केली. मात्र तरीही गुन्हा दाखल झाला. तेव्हा कंजर नावाची व्यक्ती पैसे परत मागण्यासाठी गेली तर तुमच्या संरक्षणासाठी ते पैसे मागितले होते. असे वाघ यांनी संबंधितास सांगितले असा आरोप मलिक यांनी केला. याबाबतची एक व्हिडीओ क्लीप देखील त्यांनी पत्रकारांना दाखवली. यावरुन अवैध धंदेवाल्यांना भाजप पाठीशी घालत असल्याचे सिद्ध होत आहे. याबाबत आपण ’क्लिनचिट देण्यात माहिर असलेल्या’ मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाकडी प्रकरणात दडपशाही
जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलांना नग्नावस्थेत मारहाण करण्याची घटना घडली आहे. त्या गावात जावून पीडित मुलांच्या पालकांची भेट घेतली. येथे देखील भाजपाचे मंत्री गिरीश महाजन हे प्रकरणात दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवत आहे. पीडित कुटुंबीयांना जबरदस्तीने मिडीयासमोर जबाब देण्याबाबत दबाव टाकला जात असल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांनी यावेळी केला.
समता नगरमधील बालिका अवैध धंद्यांची बळी
जळगाव शहरातील समतानगर मध्ये एका बालिकेवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. याचा धागा देखील अवैध व्यवसायांकडे वळत आहे. ज्या आदेशबाबाला पोलिसांनी पकडले आहे. तो ज्या परिसरात राहतो त्या परिसरात राजरोसपणे अवैध धंदे चालत आहेत. चरस, गांजा, दारू हे व्यवसाय चालतात. याच व्यवसायांमुळे बालिकेचा बळी गेला आहे. भाजपाचे सरकार आल्यापासून अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे या घटनेला देखील भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप मलिक यांनी केला.



























































