
सामना प्रतिनिधी । मुंबई
पगारवाढीसाठी एसटी कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपात सहभागी होणे नव्याने नोकरीवर लागलेल्या १०१० कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे. कामावर लागून महिना-दोन महिने होत नाहीत तोच संपात सहभागी झाल्याने त्यांना बडतर्फीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
वेतनढीसाठी एसटी कर्मचाऱयांनी ८ आणि ९ जून रोजी संप पुकारला होता. उन्हाळय़ाची सुट्टी संपवून गावावरून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना या संपाचा फटका बसला होता. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कर्मचाऱयांनी हा संप मागे घेतला होता. कर्मचारी विनापरवानगी कामावर गैरहजर राहिल्यामुळे महामंडळाचा महसूल बुडाला, प्रवाशांची गैरसोय झाली आणि महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवून त्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नव्याने भरती झालेल्या नऊ हजार कर्मचाऱयांपैकी एक हजार कर्मचाऱयांनी संपात सहभाग घेतला होता. आपल्या नोकरीवर रुजू होऊन अवघे काही दिवस झाले असताना संप करणे बेकायदेशीर असल्याने एसटी प्रशासनाने ही कारवाई केली.
दिवाकर रावते,
परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष



























































