
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यात प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्याच दिवशी लाखो रुपयांच्या दंडाची वसुली झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये २ लाख ६० हजार तर ठाण्यात ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. चंद्रपूरमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱयांमध्ये बाचाबाची झाली. अनेक भागांत पालिका अधिकारी व दुकानदारांमध्ये भांडणे झाल्याचे वृत्त आहे.
चंद्रपूर महापालिकेच्या विशेष पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गोलबाजारातील अनेक दुकानदारांकडून मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टिक जप्त केले. यावेळी अनेक दुकानदार आणि पालिका अधिकाऱयांमध्ये बाचाबाची झाली.
नोटाबंदीसारखा एका रात्रीत निर्णय नाही…
यासंदर्भात राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, प्लॅस्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेतलेला नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी नऊ महिने राज्यात जनजागृती केली आहे. त्यामुळे राज्यातील ९० टक्के जनतेने या बंदीला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला आहे.
मुजोर मॅकडोनाल्डवर खटला दाखल करणार; चार ठिकाणी कारवाई
पालिकेने शक्यतो दंडात्मक कारवाई न करण्याचे ठरवले होते मात्र मॅकडोनाल्ड, स्टार बक, सिलेरिया, फूड हॉल या चार मोठय़ा ब्रँडच्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आणि प्लॅस्टिकबंदीची पहिली पावती फाडली. या चारही ठिकाणी त्यांच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर प्रतिबंधित प्लॅस्टिकचा साठा आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याकडून ५००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र मॅकडोनाल्डने दंडही भरण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार खटला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.
आता उत्पादकांवर कारवाई
जनतेच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय आहे. प्लॅस्टिकबंदी ही काळाची गरज होती. येत्या काही दिवसांत उत्पादकांवर पूर्णपणे कारवाई केली जाईल. मग दुकानदार व सर्वसामान्यांकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसणार नाहीत असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले.
उल्हासनगर
२० जणांविरोधात गुन्हा दाखल; १ लाख रुपयांचा दंड वसूल
नाशिक
७२ जणांवर कारवाई, ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल




























































