
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करून तुम्हाला पासपोर्ट काढता येणार आहे. तांत्रिक अडचणी कमी करून सुटसुटीत व सर्वांना शक्य होईल अशी नियमावली तयार करण्यात आली आहे. देशात सध्या ३०७ पासपोर्ट सेवा केंद्रे (पीएसके) सुरू झाली असून, जवळपास ५४३ पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे (पीओपीएसके) सुरू करणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मोबाईल अॅप उद्घाटनप्रसंगी दिली. यावेळी दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा, विदेश राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग यांची उपस्थिती होती. विधवा महिलांच्या पतीची किंवा वडिलांची कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. अनाथ मुलांना अनाथालयातील जन्मतारीख व पत्ता पुरावा मानला जाईल तर साधूसंत व संन्यासी यांच्याबाबतीत गुरूचे नाव ग्राह्य धरणार असल्याची माहिती देण्यात आली. या अॅपचा फायदा म्हणजे अर्जदार जो पत्ता फॉर्मवर भरेल त्याच पत्त्यावर पोलीस व इतर प्रक्रिया पार पडेल. पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर पासपोर्टधारकाला घरपोच पासपोर्ट मिळणार आहे.
























































