
सामना प्रतिनिधी, नाशिक
घोटीजवळील खेडभैरव येथील आदिवासी तरुणाने जास्त शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने टोमणे मारणाऱ्या काकूसह वहिनी व पुतण्याची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली, तर एक पुतण्या गंभीर जखमी आहे. या तिहेरी हत्याकांडाने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली असून, घोटी पोलिसांनी या माथेफिरूला अटक केली आहे.
खेडभैरवजवळ माळवाडी येथील चिमटे वस्तीवरील सचिन गणपत चिमटे (२१) याने विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले होते. इतके शिक्षण होवून नोकरी नसल्याने चुलत काकू हिराबाई शंकर चिमटे (५५) ही त्याला नेहमी टोमणे मारत असे. त्या रागातूनच सचिनने शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घर गाठून हिराबाई यांच्यावर चाकूने वार केले. त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या सून मंगल गणेश चिमटे (३०), तिची मुले रोहित (५) व यश (६) यांच्यावरही सचिनने हल्ला चढविला. अतिरक्तस्त्रावाने दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहितचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. सचिनच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतल्याने यश बचावला, तरीही त्याच्या हातावर गंभीर जखम झाली असून, त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिराबाईंचे पती शंकर चिमटे यांनी ही माहिती घोटी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाजवळील राहत्या घरातून सचिनला ताब्यात घेतले, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी दिली आहे.

























































