मॅट्रिमोनियल साईटद्वारे महिलांना लुटणाऱ्या तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

मॅट्रिमोनियल साईट्सवर फेक प्रोफाईल महिलांशी मैत्री करून त्यांना लुटणाऱ्या एका तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक झाली आहे. कृष्णा देवकट (३१) असं या तरुणाचं नाव असून तो आधीच विवाहित आहे. एका ३७ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

कृष्णा मॅट्रिमॉनियल वेबसाईटवर फेक प्रोफाईल तयार करायचा. त्यानंतर स्वतःला इंजिनिअर म्हणवत आपल्याला १४ ते १५ लाख रुपये प्रतिमहिना पगार असल्याच्या बाता मारायचा. ३५ ते ४५ वर्षांच्या महिलांना लक्ष्य करत तो त्यांच्याशी मैत्री करायचा आणि अश्लील गप्पाही करायचा. हळूहळू भेटीगाठी वाढवत तो महिलेचा विश्वास संपादन करायचा आणि मदतीच्या नावाखाली १० ते १२ लाख रुपयांची मागणी करायचा. त्याच्या भूलथापांना फसलेल्या महिला त्याला २-३ लाख रुपये देत असत आणि ते पैसे घेऊन कृष्णा पोबारा करत असे. त्याच्या भूलथापांना आजवर अनेक उच्चशिक्षित महिलाही बळी पडल्या आहेत. महिलांना फसवून त्याने ५० लाखांची माया गोळा केली.

पण, यातीलच एका महिलेने कृष्णाविरुद्ध पोलिसात तक्रार केली आणि त्याचं भांडं फुटलं. पोलिसांनी त्याच्या माग काढत त्याला अटक केली. अटक करतेवेळीही तो १० महिलांसोबत चॅटिंग करत होता, असं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.