रानसई धरण परिसर पर्यटकांनी फुलला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकुमार भगत, न्हावाशेवा

रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे रानसई धरण परिसरात हजारो पर्यटक पावसाळी पर्यटनाची मजा घेण्यासाठी आले होते. मात्र पोलीस आणि एमआयडीसी प्रशासनाने धरणाजवळ जाण्यास बंदी केल्यामुळे या पर्यटकांचा हिरमोड झाला. नवी मुंबई, ठाणे या परिसरातील हजारो पर्यटक रानसई धरणाच्या परिसरात पर्यटनासाठी येत असतात. धरण परिसरात बंदी घातल्यानंतर या पर्यटकांनी नदीच्या पात्राकडे आपला मोर्चा वळविला होता. पर्यटकांच्या गर्दीने रानसई नदीची पात्र फुलून गेली होती.

निसर्गाने नटलेल्या, सळसळणाऱ्या नदीच्या प्रवाहात पोहण्यासाठी तसेच धरणाच्या उंचावरून पडणाऱ्या धारा अंगावर झेलण्यासाठी पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी व शनिवार, रविवारी हजारो पर्यटक येतात. शुक्रवारी रानसई धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर रविवारी या धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र सुरक्षेच्या कारणासाठी एमआयडीसीने आणि पोलीस प्रशासनाने धरणावर जाण्यास बंदी घातली होती. त्यामुळे धरणाची मजा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी बाजूलाच असणाऱ्या फार्म हाऊस, रिसॉर्ट तसेच नदीच्या किनाऱ्यावर आपला मोर्चा वळविला होता. वरून पडणारा पाऊस, खाली सळसळणारे नदीचे पाणी आणि धुक्याने नटलेला निसर्ग यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला होता. अनेक पर्यटक आपल्या चार चाकी वाहनातील साऊंड सिस्टीम तसेच डिजे लावून मौज मजा करतानाचे चित्र सर्वत्र दिसत होते.