
सामना प्रतिनिधी, नागपूर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी सवादोन वर्षांनंतर आज प्रथमच विधानसभेत पाऊल ठेवले. पांढरा कुर्ता-पायजमा, गळय़ात लाल मफलर अशा वेषात सकाळी अकराच्या सुमारास विधिमंडळात प्रवेश केला. पहिल्याच दिवशी भुजबळ कडाडणार अशी सर्व लोकप्रतिनिधींनी बांधलेली अटकळ खरी ठरली. सभागृहात त्यांची पहिली ठिणगी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत उडाली. या सरकारने लोकांची फसवणूक केली. चार वर्षांत या भाजप सरकारने काय दिवे लावले ते मला माहीत आहे. सरकारने राज्याची आर्थिक स्थिती बिघडवली, असा घणाघाती आरोप भुजबळ यांनी पहिल्याच भाषणात केला.
सकाळी सवाअकराच्या सुमारास छगन भुजबळ यांनी विधिमंडळाच्या आवारात प्रवेश केला तेव्हा प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे धाव घेतली. प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद न साधता ते थेट सभागृहात गेले. सभागृहात ते सुरुवातीला शांत बसले होते, पण पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना त्यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला. राज्यातील जनतेला या सरकारने अनेक आश्वासने दिली. राज्य खड्डेमुक्त-टोलमुक्त करणार त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. राज्यातील अनेक गावांमध्ये आज वीज नाही. गावागावात वीज पोहोचवू, असे आश्वासन सरकारने दिले होते.
मुनगंटीवार-भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक
नाशिक जिल्ह्यात झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याने जमिनीचे पट्टे तयार करण्यास वेळ नसल्याचे जिल्हाधिकारी सांगतात. खासगी जमिनीवरही झाडे लावतात, असा आरोप भुजबळ यांनी करताच सुधीर मुनगंटावार संतप्त झाले. जमिनीचे पट्टे तयार करण्याचे काम महसूल विभागाचे असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी भुजबळ यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावर माझे बोलणे पूर्ण होऊ देत असे भुजबळ म्हणाले. मी काहीही ऐकून घेणार नाही असे मुनगंटीवर म्हणाले. त्यानंतर भाषण करताना सरकारने राज्याची अर्थव्यवस्था बिघडवल्याचा आरोप केला. त्यावर मुनगंटीवर चिडले. आमचे सर्व कामकाज पारदर्शी आहे. तुमच्यासारखे लपवण्यासारखे आमच्याकडे काही नाही, असा टोला मारला. भुजबळ व मुनगंटीवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मुनगंटीवार यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

































































