वाहने, घरघंटी, ताडपत्री खरेदीतून ६ हजार कोटींचा घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

सामना प्रतिनिधी, मुंबई

तत्कालीन आदिवासी विकासमंत्री व भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार गावीत यांच्या काळात झालेल्या वाहने, घरघंटी, ताडपत्री खरेदीतून ६ हजार कोटींच्या घोटाळाप्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश देऊनही सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले. गायकवाड समितीने अहवाल सादर केल्यानंतर वर्षभरात सरकारने काय पावले उचलली, किती जणांविरोधात गुन्हे दाखल केले याचा जाब विचारत हायकोर्टाने आज सरकारला झापले. एवढेच नव्हे तर याप्रकरणी चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर केले म्हणून अधिकाऱयांविरोधात अवमानाची का कारवाई करू नये, असा सवालही सरकारला विचारला.

दहा दिवसांत कारवाई करा
या घोटाळ्यातील दोषींना पाठीशी घालणाऱ्या सरकारला झापत न्यायालयाने दहा दिवसांत संबधितांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारला दिले. तसेच त्याबाबतचा अहवाल कोर्टासमोर मांडण्याचे बजावत २३ जुलैपर्यंत याबाबतची सुनावणी तहकूब केली.