
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रेम म्हणजे प्रेम असतं पण सगळ्यांचं सारखं नसतं… प्रेम जीव लावतं आणि जीव घेतंही… प्रेमकहाणी जितकी जीव लावणारी असते त्याचा अंतही जीवघेणा असतो का… अशी टॅगलाइन घेऊन प्रेमाचा विकृत रंग दाखवणारी प्रोमो सध्या टीव्हीवर झळकत आहे. स्टार प्रवाहवरील ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नव्या मालिकेची ही प्रोमो आहेत. प्रेमातील नाजूक, हळुवारपणाला छेद देऊन त्यातील खुनशी, हिंसक वृत्ती अधोरेखित करणारी ही प्रोमो समाजाला कोणती दिशा देत आहेत, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. एकीकडे मुली आणि महिलांवरील अत्याचार वाढत असताना अशा मालिका दाखवून काय साध्य केले जात आहे, अशी विचारणा सुजाण प्रेक्षक करीत आहेत.
अभिनेता गश्मीर महाजनी सूत्रसंचालक असलेली ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका १६ जुलैपासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेच्या प्रोमोने सध्या थरकाप उडवला आहे. एका शाळकरी मुलीला ‘सरू तू फक्त माझीच आहेस’ अशी चिठ्ठी आणि गुलाबाची फुले पाठवणारा शिक्षक एका प्रोमोत दिसत आहे. दुसऱ्या प्रोमोत प्रियकराच्या मदतीने नवऱ्याच्या खून करून तो कारमध्ये मागच्या सीटवर ठेवला आहे. याशिवाय प्रेमातील विकृती दाखवणारे लहान लहान व्हिडीओ यूटय़ूबवरही सध्या दिसत आहेत. यावर सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे.
मुलांच्या मनाचा विचार व्हावा
प्रेमातील वाईट प्रवृत्ती दाखवून त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न होणार असेल तर अशा मालिका समाजासाठी नक्कीच घातक ठरतील. जर असे प्रसंग मुली- महिलांवर ओढवू नयेत म्हणून काय सावधपणा बाळगावा हे सांगितले जाणार असेल तर चांगलेच आहे. पण एक लक्षात घेतले पाहिजे की, अशा मालिका किशोरवयीन मुले बघतात. त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
– डॉ. सागर मुंदडा,
मानसोपचारतज्ञ, हेल्थप्रिंग मुंबई
टीआरपीसाठी वाट्टेल ते
टीव्ही चॅनेलवर टीआरपी स्पर्धा वाढली आहे. त्या स्पर्धेत आपले चॅनेल मागे पडू नये यासाठी सगळा खटाटोप आहे. काही तरी वेगळा कार्यक्रम प्रेक्षकांना देण्याच्या नावाखाली असे प्रयोग केले जातात. टीव्ही माध्यम समाजमनाचा आरसा आहे असे मी मानतो. मग वाहिन्या ही जबाबदारी विसरत चालल्यात का? सिनेमात खलनायकांना हीरो करून प्रेक्षक डोक्यावर घेतात. हे कुठे तरी थांबले पाहिजे असे वाटते.
– कांचन अधिकारी,
निर्माती, दिग्दर्शिका





























































