श्रीसाधूदेव मामलेदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

प्रपंच आणि परमार्थ यांची उत्तम सांगड घालून ‘देव’पदावर विराजमान झालेल्या ‘साधू’ मामलेदारांचा हा अनोखा परिचय.

स्वप्नात दिसलेला महापुरुष कोण असावा’ या विषयीची यशवंतरावांची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतच होती. या अस्वस्थ मनःस्थितीत असताना एका रात्री तो साधुपुरुष पुन्हा एकदा यशवंतरावांच्या स्वप्नात प्रकट होऊन त्यांना सांगता झाला, ‘तो शाळिग्राम घेऊन आमच्या भेटीस यावे. आम्ही सध्या मंगळवेढय़ास मुक्काम करून आहोत.’ झोपेतून जागे होताच यशवंतरावांनी ‘वाट्टेल ते करून त्या सत्पुरुषाचा शोध घ्यायचाच’ असा निश्चय केला आणि दुसऱ्याच दिवशी ते मंगळवेढय़ास निघाले.

मंगळवेढा येथे जाऊन यशवंतरावांनी प्रत्येक घराघरातून शोध घेण्यास प्रारंभ केला आणि अचानकपणे त्यांना एका वाडय़ामध्ये त्या महापुरुषाचे दर्शन घडले. स्वप्न दृष्टांतामध्ये ज्या अवस्थेत त्या सिद्धाचे दर्शन घडले होते त्याच अवस्थेत तो दृष्टिपथात आलेला पाहून यशवंतरावांनी महापुरुषासमोर तात्काळ दंडवत घातला. कित्येक दिवसांपासून लागलेली मनाची तळमळ आता पूर्णपणे शमली. यशवंतरावांची त्या सत्पुरुषासोबत क्षणभराची नजरानजर झाली, तेव्हा त्याने यशवंतरावांच्या मस्तकावर हात ठेवून म्हटले, ‘आम्ही तुमच्यातील देवत्वाचे भान जागृत करीत आहोत बरे!.’

सिद्धसत्पुरुषाचा हस्तस्पर्श होताच यशवंतराव एका वेगळ्याच आनंददायी विश्वात दंग झाले, जणू भावसमाधीच ती. आजवर कधीही न अनुभवलेली उत्कट भावावस्था त्यांना प्राप्त झाली. गूढ, अपरिचित ‘परमेश’तत्त्वाचा शोध लागावा किंवा ईश्वरीय साक्षात्काराची अनुभूती निर्माण व्हावी असेच काहीसे त्यांच्या बाबतीत झाले. भानावर येताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या आणि तक्षणी यशवंतरावांच्या डोळ्यांसमोर लख्ख प्रकाश पसरला अन् त्यामागून शब्द ऐकू आले, ‘तुला देवाच्या मागे जाण्याची गरज नाही. आता, तुलाच देव समजून समस्त जनलोक तुझ्या मागे धावतील.’ भावसमाधीचा अंमल ओसरला. यशवंतरावांनी त्यांना प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीद्वारे जाणले की, परमेश्वरीय चैतन्य अन्य कुणी नसून अक्कलकोटस्थ म्हणून प्रसिद्ध होणारे श्रीस्वामीसमर्थ महाराज आहेत.

श्रीस्वामीसमर्थांच्या सहवासात दोन दिवस काढल्यानंतर पुढे त्यांच्याच आज्ञेने यशवंतराव स्वगृही परतले. ‘श्रीस्वामीभेट’ घडल्यानंतर यशवंतरावांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. गुरुतत्त्वाचा साक्षात्कार झाल्यामुळे प्रापंचिक जीवनातली तगमग संपली आणि पारमार्थिक आयुष्यातील अध्यात्माच्या नागमोडी वळणाला योग्य दिशा मिळाली. घडला प्रकार त्यांनी पत्नी सुंदराबाई यांच्याही कानावर घातला.

पुढे यशवंतरावांच्या आध्यात्मिक आणि भौतिक जीवनासही चांगलीच गती मिळाली. त्यांची बदली पारनेर येथून खजिनदार पदावर कर्जत येथे झाली. येथे कार्यरत असताना यशवंतरावांची निःस्पृहता, सचोटी आणि प्रामाणिकता वरिष्ठांच्या नजरेस आल्याने ‘शिरस्तेदार’ या पदावर त्यांना बढती देण्यात आली. पुढे दोनच वर्षांनी यशवंतराव ‘महालकरी’ पदापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर पुढे वर्षभरातच त्यांची बदली खान्देशात कलेक्टर ऑफिसमध्ये दुय्यम चिटणीस म्हणून झाली. त्यानंतर आपल्या कार्यशैलीच्या जोरावर अल्पावधीत ‘दफ्तरदार’ पदावर पोहोचलेले यशवंतराव पुढे चाळीसगाव सुभ्याचे ‘मामलेदार’ झाले. यशवंतरावांची कामातील सचोटी, प्रामाणिकता, परोपकारी वृत्ती, मनमिळाऊ स्वभाव आदी गुण जमेस धरून ते ‘मामलेदार’पदावर रुजू झाले. या काळात त्यांचे वास्तव्य अंमळनेर येथे होते.

यशवंतरावांनी ‘मामलेदार’पदी कार्यरत असताना त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि अध्यात्म निगुतीने सांभाळले. मामलेदार कचेरीत आपले अधिकारपद राखताना ते सज्जनांसाठी मृदू व दुर्जनांसाठी कठोर होते. यामुळेच काही विघ्नसंतोषी लोकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. एकदा यशवंतरावांनी घरातील धार्मिक कार्यासाठी वैयक्तिक कर्ज काढले असता ‘त्यांनी घेतलेले कर्ज सरकारी नियमानुसार नाही, सबब चौकशी व्हावी’ हा तगादा काही विघ्नसंतोषी मंडळींनी वरिष्ठ अधिकाऱयांसमोर लावून धरला. हे वृत्त कळताच यशवंतरावांनी मामलेदारकीचा राजीनामा दिला. हे वृत्त प्रांताधिकाऱ्यांना कळताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणामध्ये यशवंतरावांचे निर्दोषत्व सिद्ध झाल्याने प्रांताधिकाऱयानी यशवंतरावांचा राजीनामा फेटाळून लावत त्यांची शहादा येथे ‘मामलेदारपदी’ नेमणूक केली. पुढे यशवंतराव ‘मामलेदार’ म्हणून सिंदखेडराजा व त्यानंतर सटाणा – नाशिक येथे रुजू झाले.

सन १८७० – ७१ मध्ये महाराष्ट्र प्रांताला दुष्काळाचा मोठा तडाखा बसला. ‘सटाणा’ येथे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले. अन्न-पाणी न मिळाल्याने तडफडणाऱ्या गावकऱ्यांचे हाल पाहून यशवंतराव कळवळले. त्यांच्या वाडय़ासमोर याचकांची रीघ लागली. या परिस्थितीवर मात करण्याची जबाबदारी यशवंतराव ‘मामलेदार’ यांच्यावर आली. गोरगरीबांमध्ये ‘कनवाळू’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ‘देव’माणसामधील परमेश्वर जागा झाला आणि ‘मामलेदार’पदाचा अधिकार वापरून त्यांनी आपल्या ताब्यातील सरकारी खजिना गोरगरीबांसाठी खुला केला. सरकारच्या परवानगीशिवाय केलेल्या या कृत्याच्या चौकशीसाठी खातेनिहाय कारवाई सुरू झाली. या प्रकाराची खातरजमा करण्याकरिता खुद्द प्रांतसाहेब सटाण्याला आले. या कालावधीत सर्वसामान्यांसाठी ‘देव मामलेदार’ बनलेले यशवंतराव परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवून निश्चिंत होते. इथे प्रांतसाहेब खजिना तपासण्यास गेले असता त्यांना तिजोरीतील रक्कम जशीच्या तशी आढळली. एकाही पैशाची गल्लत झाल्याचे निदर्शनास आले नाही हे पाहून प्रांतसाहेब खजील झाले. कोणे एकेकाळी दामाजीपंतांच्या रक्षणार्थ पांडुरंग धावला होता, तोच विठुराया आता यशवंतरावांच्या साहाय्यास उभा ठाकला हे वृत्त पसरले आणि यशवंतराव ‘देव मामलेदार’ म्हणून प्रसिद्धीस आले.

सेवानिवृत्त झाल्यावर देव मामलेदारांनी त्यांचे उर्वरित आयुष्य ईश्वर चिंतनात घालवले. श्रीस्वामीसमर्थांस अत्यंत प्रिय असलेल्या देव मामलेदारांनी पुढे श्रीगजानन महाराज, श्रीमाधवनाथ, श्रीकृष्ण सरस्वती, श्रीवासुदेवानंद सरस्वती, श्रीवामनबुवा वांबोरीकर, श्रीगोंदवलेकर महाराज या व अशा अनेक दिग्गज सत्पुरुषांना अध्यात्ममार्गाविषयी अवगत केले. देव मामलेदारांनी आयुष्यभर जनकल्याणाचे कार्य केले. त्यांना श्रीस्वामी समर्थांकडून ‘आचार्य’पदाची दीक्षा मिळाल्याचे सांगण्यात येते. श्रीपद्मनाभाचार्य हे देव मामलेदारांचे प्रमुख शिष्य होते.

शारीरिक व्याधीने त्रस्त झालेल्या देव मामलेदारांचे निधन वयाच्या ६७व्या वर्षी झाले. त्यांची समाधी नाशिकच्या गंगातीरावर आहे. पुढे प्रसिद्धीस आलेल्या अनेक संतश्रेष्ठांचे मार्गदर्शक ‘देव मामलेदार’ होते हा एकच पुरावा त्यांची श्रेष्ठता सांगण्याकरिता पुरेसा आहे.

 – [email protected]