घोट नदीत कार कोसळली, गावकऱ्यांनी चिमुकलीसह चौघांना वाचवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । तळोजा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात नद्या-नाले तुडुंब भरले आहेत. राजगड जिल्ह्यातही सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पातळी ओलांडली असून अनेक ठिकाणी नद्यांना उधान आले आहे. तळोजा येथील घोट नदीचाही प्रवाह चांगलाच वाढला आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास घोट नदीमध्ये अशरफ खलील शेख यांची शेव्हरलेट कार (क्र. एमएच-०२-सीबी-११४९ ) घोटगाव जवळील नदीच्या पुलाच्या टर्नवर कार कंट्रोल न झाल्याने नदीत पडली व दगडात अडकली. यामुळे एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीच्या वेगवान प्रवाहापुढे कारचा टिकाव लागणार असे उपस्थित नारायण गंगाराम पाटील, लहू नारायण पाटील, लक्षमन वामन धुमाळ उर्फ बाळा, तुळशीराम बळीराम निघुकर व रुपेश रामा पाटील या गावकऱ्यांनी नदीमध्ये उतरत बचावकार्य सुरू केले. नदीचा प्रवाह वाढतच होता. परंतु त्यापुढे हार न मानता गावकऱ्यांनी कारमधील छोट्या बाळासह चार जणांचा जीव वाचवला. त्यामुळे गावकरी देवदूत होऊन मदतीसाठी धावले अशी भावना बचावलेल्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

दरम्यान, कारमधील सर्वांना किरकोळ मार लागला असून प्राथमिक उपचारानंतर ते घरी गेले आहेत. पुढील तपास तळोजा पोलीस करत आहेत.

कारमधील बचावलेल्यांची नावे –
१) अशरफ खलील शेख (३७)
२) हमीदा अशरफ शेख (पत्नी, वय – ३३)
३) सुहाणा अशरफ शेख (मुलगी, वय -०७)
४) नमीरा रहमतउल्ला शेख (पुतणी, वय – १७)