
सामना ऑनलाईन । मुबंई
छोट्या पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या. गेला काही काळ त्या किडनीविकाराने त्रस्त होत्या. सध्या त्या निमकी मुखिया या मालिकेत इमरती देवी ही भूमिका करत होत्या. किडनी विकारामुळे त्यांना दर एक दिवसाआड डायलिसिससाठी जावं लागत होतं. पण तब्येत खराब झाल्याने जवळपास दहा दिवसांपासून त्यांना सुजय रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मोठ्या पडद्यावरही त्या कार्यरत होत्या. रीता यांनी आजवर ७० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. राज, ज्युली, बेटी, दिल विल प्यार व्यार हे त्यातले काही चित्रपट. तर छोट्या पडद्यावरही त्यांनी साराभाई व्हर्सेस साराभाई, छोटी बहु, कुमकुम, खिचडी अशा गाजलेल्या मालिकांमधून भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट आणि मालिकासृष्टीत शोककळा पसरली आहे.

























































